सातारा : कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू

शिवाजीनगरच्या डोंगरावर मधमाश्यांपासून बचावाच्या प्रयत्नात घटना
Someshwar Kadam
Someshwar KadamSakal

नागठाणे - चवताळलेल्या मधमाश्यांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाचा कड्यावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजीनगर (ता. सातारा) येथील शिलोबा डोंगरावर आज सकाळी ही घटना घडली. हा मुलगा आपल्या आजोळी यात्रेसाठी आला होता. सोमेश्वर विलास कदम (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. तो तारळेलगत असलेल्या आंबळे (ता. पाटण) या गावचा रहिवासी आहे. सोमेश्वर हा शिवाजीनगर येथील आपले आजोबा संपत धनवडे यांच्याकडे यात्रेसाठी आला होता. उद्या (सोमवारी) शिवाजीनगर येथील ग्रामदैवत शिलनाथ देवाची वार्षिक यात्रा आहे. आदल्या दिवशी शिलोबा डोंगरावर नैवेद्य घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्या दृष्टीने गावातील ग्रामस्थ तसेच अन्य मुलांसह सोमेश्वर आज सकाळी नैवेद्य घेऊन डोंगरावर गेला होता.

त्याचदरम्यान, डोंगरकपारीत असलेल्या मधमाश्यांनी लोकांवर हल्ला केला. त्यानंतर डोंगरावर पोचलेले लोक बचावासाठी सैरावैरा धावू लागले. काही जण मधमाश्यांच्या चाव्यात जखमी झाले. अशा वेळी बचावाच्या प्रयत्नात असलेला सोमेश्वर कड्याच्या एका बाजूला गेला. अशातच अंदाज न आल्यामुळे तो शेरेवाडी बाजूकडील कड्यावरून खाली कोसळला. छातीला, डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर येथील ग्रामस्थ, नातेवाईक तसेच साताऱ्यातील शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा डोंगराच्या मधील टप्प्यात असलेल्या झाडीत सोमेश्वरचा मृतदेह आढळला. त्यानंतर शोधकार्यासाठी गेलेल्या युवकांनी मोठ्या प्रयासाने तो डोंगरावरून खाली आणला. रुग्णवाहिकेने तो सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, शोधकार्यासाठी गेलेले काही युवकही मधमाश्यांच्या चाव्यात जखमी झाले. त्यांच्यावरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आंबळे परिसरावर शोककळा

तारळे : आंबळे येथील सोमेश्वर विलास कदम याचा कड्यावरून पडून दुर्दैवी अंत झाला. शिवाजीनगर येथील घटनेने सारा परिसर सुन्न झाला आहे. दहावीची परीक्षा उरकून मामाच्या गावी गेलेल्या सोमेश्वरवर काळाने घाला घातल्याची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. घटनेने आंबळेसह परिसरावर शोककळा पसरली असून, तारळे भागातून हळहळ व्यक्त होत आहे. सोमेश्वर ढोरोशी येथील हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. आंबळे येथे आई-वडील, आजी व भावासोबत तो राहतो. वडील शेती व रंगकाम करत कुटुंबाचा गाडा हाकतात. आजच्या घटनेने कुटुंब हादरले आहे. सोमेश्वरने दहावीची परीक्षा दिली होती. वडीलधारी मंडळींचे ऐकणारा शांत व समजूतदार असा त्याचा स्वभाव होता. शाळेतही तो विविध कार्यक्रमात सहभागी होत असे. कृतिशीलतेत पुढे असणाऱ्या सोमेश्वरचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शिक्षकांनाही मनाला बोचणारी ठरली आहे. कदम कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी त्याचा मृतदेह आंबळे येथे आणल्यावर नातेवाईकांनी फोडलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधमाश्यांच्या चाव्याच्या घटना

शिलोबाचा डोंगर अतिशय उंच आहे. शेवटच्या टप्प्यात डोंगरावर चढण्यासाठी नैसर्गिक दगडी पायऱ्या आहेत. डोंगरावर जाण्यासाठी व उतरण्यासाठी हीच एकमेव वाट आहे. या परिसरात मधमाश्यांची मोठाली पोळी आहेत. यापूर्वीही मधमाश्यांनी लोकांना चावा घेतल्याच्या घटना येथे घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com