यामुळे नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना सोडाव्या लागल्या खुर्च्या

यामुळे नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना सोडाव्या लागल्या खुर्च्या


कोरेगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही पाणी योजनांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने येत्या 15 जुलैपर्यंतची मुदत मागून तसे लेखी आश्वासन आज दिल्यानंतर सोनेरी ग्रुपने पुकारलेले जनआंदोलन मागे घेतले. ही कामे त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन सोनेरी ग्रुपने यापूर्वी दिले होते. दरम्यान, गेल्या 20 तारखेला दैनिक "सकाळ'ने "गढूळ, शेवाळमिश्रित' पिण्याच्या पाण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या निदर्शनास आणून दिली होती. 
गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेला औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास 27 मे रोजी म्हणजे आज जन आंदोलनाचा इशारा नागरिकांच्या वतीने सोनेरी ग्रुपने नगरपंचायत प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता. 

या पार्श्वभूमीवर सोनेरी ग्रुपच्या सदस्यांसह सोनेरी सखी मंच, क्रांती महिला मंडळ, आझाद चॅरिटेबल ट्रस्ट, बुरुडगल्ली, वेताळगल्ली, बाजारपेठ, संभाजीनगर परिसरातील नागरिक प्रशासनाकडे कार्यवाहीसंदर्भातील विचारणा करण्यासाठी नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर थडकले. 

नागरीकांच्या तीव्र भावनांचा विचार करून नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, उपाध्यक्षा संगीता बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेविका अर्चना बर्गे, मुख्याधिकारी अशोक कुंभार हे आपापली दालने सोडून नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर आले. 
या वेळी आंदोलकांच्या वतीने संतोष नलावडे, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, सचिन बर्गे, अजित बर्गे, विमल नलावडे, मुन्नाभाई काझी यांनी प्रशासनाला जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कार्यवाहीबाबत विचारणा केली. त्यावर मुख्याधिकारी कुंभार, तसेच नगराध्यक्षा कोकरे, उपाध्यक्षा बर्गे यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांच्या प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर युवा नेते किरण बर्गे, अर्चना बर्गे, राजाभाऊ बर्गे, किशोर बर्गे यांनी "सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तातडीने निर्णय घेत आहोत, येत्या काही दिवसांत 95 लाखांच्या निधीतून दोन्ही योजनांची जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित होईल. तत्पूर्वी तात्पुरत्या स्वरूपातील यंत्रणेद्वारे शुद्ध पाणी पुरवण्याचा, तसेच काही भागांत टॅंकरद्वारे पाणी देण्याचाही प्रयत्न केला जाईल,' असे स्पष्ट केले. त्यावर आंदोलकांनी प्रशासनाकडून लेखी म्हणणे मागितल्यावर बराच गदारोळ झाला. अखेर प्रशासनाने येत्या 15 जुलैपर्यंतची मुदत मागितली. तांत्रिक मान्यता, 95 लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी व या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी कुंभार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी सल्लागार अभियंता काकडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रताप बुधावले यांच्यासह नगरपंचायतीचे विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. सातारा सातारा सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com