या गावात हॉस्पिटलसमोरच कोरोना बाधिताचा तडफडत मृत्यू

संजय जगताप | Wednesday, 5 August 2020

खटाव तालुक्‍यातील मायणीतील कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटर व मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलशी संपर्क साधला. मात्र, कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. रिमझिम पाऊस व प्रचंड गारठ्यातच पहाटे तास-दोन तास मदतीची प्रतीक्षा करीत शिंदे कुटुंबीयांना रस्त्यावर बसावे लागले. त्यात उपचाराअभावी नरेंद्र शिंदे या काेराेना बाधिताचा तडफडत मृत्यू झाला. 

मायणी (जि. सातारा) : मोराळे (ता. खटाव) येथील नरेंद्र सदाशिव शिंदे (वय 45) या कोरोना बाधिताचा येथील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या गेटवरच उपचाराअभावी दुर्दैवी निधन झाले. त्याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. 

त्याबाबत घटनास्थळ व सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी : मोराळेतील मूळ रहिवासी असलेले नरेंद्र शिंदे हे हैदराबादमध्ये सोने-चांदी गलईचा व्यवसाय करीत होते. भाडोत्री कारने ते हैदराबादेतून गावी येण्यास निघाले. पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि कानकात्रे (वडाचा मळा) व वांझोळी (ता. खटाव) येथील दोघे असे सात जण गावी येत होते. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास त्यांची कार कानकात्रेत आली. तेथे अन्य दोघांना उतरविण्यात आले. दरम्यान, शिंदे यांना शारीरिक त्रास होऊ लागल्याने मायणीतील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्याचे ठरले. त्यानुसार हॉस्पिटलकडे कार घेण्यास सांगितले. मात्र, हॉस्पिटलमध्ये कार नेल्यास आपणासही 14 दिवस अलगीकरण कक्षात ठेवले जाईल, या भीतीने चालकाने हुशारीने शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलच्या गेटवरच गाडीतून खाली उतरण्यास भाग पाडले. सर्व जण खाली उतरताच चालक गाडी घेऊन पसार झाला. 

दरम्यान, शिंदेंच्या विनंतीवरून त्यांच्या एका मित्राने गेटवरील सुरक्षारक्षकाशी संपर्क साधून सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटर व मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलशी संपर्क साधला. मात्र, कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. रिमझिम पाऊस व प्रचंड गारठ्यातच पहाटे तास-दोन तास मदतीची प्रतीक्षा करीत शिंदे कुटुंबीयांना रस्त्यावर बसावे लागले. उपचाराअभावी शिंदे यांची धाप वाढली. दरम्यान, माहिती मिळताच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने व त्यांचे सहकारी तेथे दाखल झाले. त्यांनी तपासणी केली. मात्र त्यापूर्वीच श्वासोच्छवासाचा प्रचंड त्रास होऊन शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये तातडीची सेवा (आयसीयू) उपलब्ध असूनही उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे शिंदे कुटुंबीय संताप व्यक्त करीत आहे. नागरिकही संतप्त भावना व्यक्त करत आहेत. नरेंद्र शिदे यांची काेराेना चाचणी करण्यात आली हाेती. त्यात ते काेराेना बाधित असल्याचे निष्पन्न झाले हाेते, अशी माहिती शिंदे कुटुंबियांनी दिली.

दरम्यान, शिंदे यांचा मृतदेह बराच काळ हॉस्पिटलच्या गेटवरच पडून होता. तेथेही मृतदेहाची हेळसांड झाली. कोणीही संबंधित अधिकारी, कर्मचारी वेळेत उपस्थित झाले नाहीत. अखेर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनाचे कान उपटले. त्यानंतर धावपळ करीत मृतदेह वडूज येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नरेंद्र शिंदे यांची प्रवासातील माहिती व शारीरिक लक्षणे पाहता त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे कोरोना संशयित समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

- डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव 

माहिती मिळताच पाचच मिनिटांमध्ये आमची टीम घटनास्थळी पोचली. त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये नेले असते तर उपचार मिळून दुर्दैवी घटना घडलीच नसती. मात्र, चालकाने त्यांना गेटवरच रस्त्यावर सोडल्याने नामुष्की झाली. 

- डॉ. सुशील तुरुकमाने, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मायणी 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

जावळीतील या दुर्गम गावात सामुहिक शेतीचा नारा