सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांचा कोंडतोय श्‍वास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन समाजातून कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी पुढाकार घेत समाजातील विविध घटकांनी घेत कोरोना केअर सेंटर सुरू केलेली आहेत. मात्र, या सेंटरसाठी डॉक्‍टर्स, अन्य स्टाफची वानवा असतानाच ऑक्‍सिजनच्या तुटवड्याशी प्रशासनाला सामना करावा लागतो आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांचा कोंडतोय श्‍वास!

कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना केअर सेंटर होऊ लागलेली आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात उभ्या राहणाऱ्या या सेंटरना ऑक्‍सिजन, औषधांसह अन्य सामग्री उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यातच जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवू लागला असल्यामुळे रुग्णालयांची ऑक्‍सिजन व्यवस्थापनही ढासळू लागलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर कोविड रुग्णालयांसह कोरोना सेंटरमध्ये जाणवणाऱ्या ऑक्‍सिजनच्या तुटवड्यावर उपाय शोधण्याचे आव्हान आहे. रुग्णसंख्येप्रमाणे डॉक्‍टर्स, रेमडिसिव्हर इंजेक्‍सनसह अन्य औषधे पुरवण्याच्या नियोजनाचाही अभाव आहे. 


जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 33 हजारांवर पोचले असून, तब्बल 23 हजारांवर नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. आठ हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात कऱ्हाड तालुका हॉटस्पॉटवर आहे. त्या खोलोखाल सातारा व अन्य तालुके आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन समाजातून कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी पुढाकार घेत समाजातील विविध घटकांनी घेत कोरोना केअर सेंटर सुरू केलेली आहेत. मात्र, या सेंटरसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देताना शासकीय पातळीवर दमछाक होताना दिसते आहे.

डॉक्‍टर्स, अन्य स्टाफची वानवा असतानाच ऑक्‍सिजनच्या तुटवड्याशी प्रशासनाला सामना करावा लागतो आहे. त्यासोबत महत्त्वाच्या औषधांचाही तुटवडा आहे. त्यावर मात करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. ऑक्‍सिजन तुटवडा पडू देणार नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्वाही दिली असली तरी सध्या अनेक कोविड हॉस्पिटलसह कोरोना सेंटरमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. कोरोनापूर्वी ऑक्‍सिजनचा मोठा ड्युरा सिलिंडर आणला की तो हॉस्पिटलला किमान पाच दिवस जायचा. मात्र, आता तो सिलिंडर दिवसाला लागतो आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्‍सिजनची गरज भासू लागल्याने हॉस्पिटलचे ऑक्‍सिजन व्यवस्थानपही ढासळले आहे.

मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, ऑक्‍सिजन नाही, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतो आहे, मात्र, तरीही प्रशासनासमोर ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचे, त्याच्या वाहतुकीचे कोणतेच नियोजन दिसत नाही. ऑक्‍सिजन उपलब्ध होत असला तरी त्याची वाहतूक करणारी वाहने नाहीत. त्यामुळेही ऑक्‍सिजनचा तुटवडा वाढतो आहे. ऑक्‍सिजन प्लॅन्ट उभा करण्यासाठीही प्रयत्न झाल्यास ते फायद्याचे होणार आहे. मात्र, ती स्थिती वेळखाऊ आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या ऑक्‍सिजनची वाहतूक करून तो गरजूपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्यासोबत अत्यावश्‍यक रेमडिसिव्हर इंजेक्‍शनही कमी पडत आहेत. त्याच्याही नियोजनाची गरज आहे. 

""जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत असून, त्याची माहिती घेतली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. ऑक्‍सिजनचा तुटवडा पडू नये, यासाठी राज्य शासनाने विशेष योग्य खबरदारी घ्यावी, यासाठी प्रयत्न करत आहोत. ऑक्‍सिजन आहे, मात्र त्याची वाहतूक करणारी मोठी वाहने उपलब्ध नाहीत. ती उपलब्ध करून ऑक्‍सिजनची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ऑक्‍सिजन व रेमडिसिव्हर इंजेक्‍शनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे.'' 

-पृथ्वीराज चव्हाण 
आमदार, माजी मुख्यमंत्री 

संपादन : पांडुरंग बर्गे 

loading image
go to top