ह्या महामंडळाने उद्योजकांना केले 74 कोटींचे अर्थसाह्य

राजेश पाटील | Thursday, 13 August 2020

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने गेल्या दोन वर्षांत एक हजार एक उद्योजकांना आर्थिक पाठबळ देत 74 कोटी 15 लाख रुपयांचे अर्थसाह्य केले. या लाभार्थ्यांना दोन कोटी 41 लाख रुपयांचा व्याज परतावाही देण्यात आलेला आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सातारा जिल्ह्यात "गाव तिथं महामंडळ, घर तिथं लाभार्थी' ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. महामंडळाने दोन वर्षांत एक हजार एक उद्योजकांना आर्थिक पाठबळ देत 74 कोटी 15 लाख रुपयांचे अर्थसाह्य केले असून लाभार्थ्यांना दोन कोटी 41 लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आलेला आहे. 

महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे नरेंद्र पाटील यांनी चार सप्टेंबर 2018 रोजी स्वीकारली आणि पहिल्या दिवसापासूनच महामंडळाच्या विविध योजना घेऊन त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. अन्य जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातही महामंडळाची गतिमान वाटचाल सुरू असून तळागाळातील प्रत्येक मराठा युवकाला या योजनेतून कर्ज मिळावे, यासाठी त्यांच्याकडून सातत्याने बॅंकांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. महामंडळाने गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील एक हजार एक लाभार्थ्यांना 74 कोटी 15 लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून दोन कोटी 41 लाख रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. जिल्ह्यात 110 विविध व्यावसायिकांना कर्ज मंजूर झाले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक राहुल यादव यांनी दिली. ते म्हणाले, ""महामंडळाच्या माध्यमातून अनेक युवक-युवती व महिला स्वबळावर उभे राहिले आहेत. कोणतेही कर्ज थकीत नाही. महामंडळाच्या विविध संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सचिन जाधव आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.'' 

राज्यातील विविध जिल्ह्यांत महामंडळाने दमदार कामगिरी करत नवनवीन योजना गरजूंपर्यंत पोचविल्या आहेत. लॉकडाउनच्या काळातही आम्ही गरजू व लाभार्थ्यांच्या ऑनलाइन संपर्कात राहिलो आहे.'' 

- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील महामंडळ 

 

महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात तालुकानिहाय मार्गदर्शन शिबिरे, महिला मेळावे तसेच गाव तिथं महामंडळ आणि घर तिथं लाभार्थी आदी संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. 

- राहुल यादव, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील महामंडळ 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

शेतीत रमला उच्चपदस्थ युवा अभियंता