माहिती लपविणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करा : सातारा कोव्हिड डिफेन्डर्सची मागणी

माहिती लपविणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करा : सातारा कोव्हिड डिफेन्डर्सची मागणी

सातारा :  सध्या जिल्हाभरात कोरोना विषाणूने थैमान माजवले असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, सातारा कोव्हिड डिफेन्डर्सच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी जवळपास २५ सामाजिक संस्था व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिक एकत्र आले आहेत. त्यांनी या महामारीत गरजू लोकांना १३ टन अन्नधान्याचे वाटप केले. परप्रांतियांना अन्नधान्य वाटप व गावी परत जाण्यासाठी मदत केली. मात्र, आता या अडचणी संपुष्टात आल्या असून सामान्य नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डिफेंडर्सच्या सदस्यांना अनेक ठिकाणांहून मदतीसाठी फोन येताहेत. त्यातील ज्या समस्या सोडविणे शक्य आहे, त्या आम्ही सोडवित आहोतच. परंतु काही अडचणी आहेत; ज्या प्रशासनाला सांगणे आवश्यक वाटते, याबाबत कोव्हिड डिफेंडर्सचे संग्राम बर्गे, शशिकांत पवार, विनीत पाटील यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाव्दारे विनंती केली आहे. 

सातारा आणि कराड शहरात कोरोना हॉस्पिटल्समध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. कोणत्या दवाखान्यात किती बेड आहेत, त्यातील उपलब्ध किती आहेत, याची माहिती सर्वसामान्य जनतेस डॅशबोर्ड अथवा १०७७ च्या माध्यमातून मिळाल्यास सोयीस्कर ठरणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत असणा-या हॉस्पिटलमध्ये एकूण बेड किती? त्यातील योजनेत असणा-या बेडची संख्या किती, याबाबत माहिती फलक उपलब्ध करावा, तसेच माहिती लपविणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करावी. तसेच एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर लगेच अॅन्टीजेन टेस्ट करुन तात्काळ त्याला महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ सुरू करावा, तसे स्पष्ट आदेश आपण हॉस्पिटल प्रशासनाला द्यावेत. 

रेमेडिसिव्हर आणि इतर इंजक्शनचा जिल्ह्यात तुटवडा भासू लागला आहे. जिल्ह्यातील डिस्ट्रीब्युटरकडे असणा-या स्टॉकची तपासणी अधिका-यांनी करावी. कोरोना टेस्टचा निकाल यायला काही वेळा २ दिवस लागतात, त्यामुळे आय.सी.यू.चे दोन दिवसांचे चार्जेस रुग्णांकडून आकारले जाताहेत. मात्र, ज्या हॉस्पिटलला महात्मा गांधी फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू नाही, ती हॉस्पिटल ठरावीक रक्कम जमा केल्याशिवाय रुग्णाला अॅडमीट करून घेण्यास नकार देत आहे, तरी अशा हॉस्पिटल्सना असे न करण्याची सूचना द्यावी. 

क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयाच्या बाहेर रोजचा स्टॉक फलक लावणे शक्य असल्यास तशा सूचना संबंधितांना द्याव्यात. प्रशासनाने निधी उपलब्ध करून ना नफा, ना तोटा या तत्वावर रेमेडिसिव्हर इंजेक्शन डिस्ट्रीब्युटरने उपलब्ध करून द्याव्यात. जिल्हा प्रशासनाने होम सोल्यूशन गाईड लाईन्स जरी काढल्या असेल, तरी आरोग्य यंत्रणेने अजून त्याची पुरेशी तयारी केलेली नाही, असे निदर्शनास आले आहे. याबाबत पुरेसा प्रचार व प्रसार व्हावा. दरम्यान, पावसामुळे स्मशानभूमीत पाणी शिरले आहे, त्यामुळे अत्यंसंस्कार करणे अवघड झाले आहे. रोज केवळ सहा मृतदेहांवर अत्यंसंस्कार केले जात आहेत. मात्र, मृत्यूचे प्रमाण दहाच्या आसपास असल्याने रोज मृतदेह अत्यंसंस्काराविना शिल्लक राहत आहेत.  तरी प्रशासनाने रहिवास क्षेत्राबाहेर असलेली जमीन ताब्यात घेऊन तेथे अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करावी. जनतेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल प्रचंड भीती आहे, त्यामुळे त्याबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com