
जनावरे कोयना धरण शिवसागर जलाशयाकाठी चरत असतानाच दोघांनाही पोहण्याचा मोह झाला. अनिकेतला पोहायला येत होते. मात्र, सुशांतला पोहायला येत नव्हते.
कास (जि. सातारा) : रुळे (ता. महाबळेश्वर) या गावातील दोन युवकांचा कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडाले. अनिकेत भीमराव कदम आणि सुशांत लक्ष्मण कदम अशी त्यांची नावे असून, दोघेही 18 वर्षांचे आहेत. दरम्यान, सुशांतचा मृतदेह सोमवारी सापडला असून, अनिकेत बेपत्ता झाला आहे.
रुळे गावच्या ग्रामदैवताची रविवारी वार्षिक यात्रा होती. कोरोना काळात सर्व यात्रांचे प्रमुख कार्यक्रम होत नसले तरी फक्त धार्मिक विधी पार पडत आहे. मुंबईस्थित काही चाकरमानी देवदर्शनासाठी गावी येत आहेत. देवदर्शनासाठी सुशांत कदम हा मुंबईवरून यात्रेसाठी गावी आला होता. गावातील बालमित्र अनिकेत हा जनावरे चारायला घेऊन निघाला होता. आपणही मित्राबरोबर जावे म्हणून सुशांतही अनिकेतसोबत गेला. जनावरे कोयना धरण शिवसागर जलाशयाकाठी चरत असतानाच दोघांनाही पोहण्याचा मोह झाला. अनिकेतला पोहायला येत होते. मात्र, सुशांतला पोहायला येत नव्हते. दोघेही कपडे काढून सायंकाळच्या सुमारास शिवसागर जलाशयात पोहायला उतरले. मात्र, सुशांतला पोहायला येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.
शिवेंद्रसिंहराजेंचा डाव राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा?
या वेळी अनिकेत त्याला वाचविण्यासाठी सरसावला असता, सुशांतने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला असावा व त्यातच दोघेही बुडाले. खूप वेळ होऊनही मुले घरी का आली नाहीत, म्हणून घरातील व गावातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. परंतु, याच वेळी नदीकाठी कपडे दिसल्याने दोघेही बुडाल्याचा संशय लोकांना आला. गावातील यात्रेचे सर्व धार्मिक विधी रद्द करण्यात आले असून, दोघांचेही शोधकार्य सुरू केले. सुशांत कदम याचा मृतदेह सोमवारी दुपारी तीन वाजता सापडला आहे, तर अनिकेतचा शोध सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास तापोळा पोलिस आउट पोस्टचे हवालदार दिगंबर माने व राहुल गायकवाड करत आहेत.
जलसिंचनचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव
संपादन : बाळकृष्ण मधाळे