esakal | कळंबेत रिक्षाच्या धडकेत चिमुकली ठार; मद्यधुंद चालकाला चोप देत संतप्त जमावाने पेटवली रिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

रिक्षाची धडक बसल्याने रुक्‍मिणी, श्रावण व अन्वी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कळंबेत रिक्षाच्या धडकेत चिमुकली ठार; मद्यधुंद चालकाला चोप देत संतप्त जमावाने पेटवली रिक्षा

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कळंबे (ता. सातारा) येथे काल (ता. 2) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद मालवाहू रिक्षाचालकाने (ऍपे टेंपो) पाठीमागून धडक दिल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातात वृद्धेसह चार वर्षांचा मुलगाही जखमी झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या चालकास गावातील युवकांनी पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याची रिक्षा पाचटीने पेटवून दिला. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

अन्वी विकास इंदलकर (वय 2, रा. कळंबे, ता. सातारा) असे मृत चिमुकलीचे, तर रुक्‍मिणी कृष्णा इंदलकर (वय 58), श्रावण मदन इंदलकर (वय 4) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी मदन कृष्णा इंदलकर (रा. कळंबे) यांच्या फिर्यादीनुसार चालक प्राण काशिनाथ पवार (रा. आकले, ता. सातारा) याच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल कळंबे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा होती. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे मंदिर बंद होते. त्यामुळे ग्रामस्थ बाहेरूनच दर्शन घेत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास मदन यांच्या आई रुक्‍मिणी या नातू श्रावण व नात अन्वी यांना घेऊन भैरवनाथाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांचे कुटुंबीय शेतातील वस्तीत राहतात. दर्शन घेतल्यावर त्या घरी परत निघाल्या होत्या. पोलिस पाटील विष्णू लोहार यांच्या घरासमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. चालक प्राण हा मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे तो सुसाट होता. 

मल्हारपेठेत झुणका भाकर केंद्रावर पोलिसांचा हातोडा; तहसीलदारांच्या उपस्थितीत अतिक्रमणांवर कारवाई

रिक्षाची धडक बसल्याने रुक्‍मिणी, श्रावण व अन्वी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अन्वीचा मृत्यू झाला. रुक्‍मिणी व श्रावण यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गावातील लोकांची मोठी गर्दी जमली होती. काही युवकांनी दुचाकीवरून पाठलाग करत प्राणला गावाच्या शीवेवरच पकडले. त्या वेळी तो दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. तरुणांनी त्याला रिक्षासह गावात आणले. त्यानंतर संतप्त जमावाने उसाची पाचट टाकून रिक्षा पेटवून दिली. याबाबतची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी प्राणला ताब्यात घेतले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top