esakal | ग्रामपंचायतीत 'माहिती अधिकाराचा अर्ज' का दिला म्हणून सरपंचाकडून ग्रामस्थाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

गुरुदास काळेल यांनी गावातील गायरानमध्ये असणाऱ्या घरांचे आठ "अ'चे उतारे मिळावेत, म्हणून 7 एप्रिल रोजी माहिती अधिकाराचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडे दिला होता.

ग्रामपंचायतीत 'माहिती अधिकाराचा अर्ज' का दिला म्हणून सरपंचाकडून ग्रामस्थाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का दिला, असे म्हणत वळई (ता. माण) गावाचे सरपंच बबन काळेल, त्यांची मुले, ग्रामपंचायत सदस्य सोपान काळेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुदास काळेल यांना लाकडी काठी व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना घडली. संशयितांविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती अशी, गुरुदास काळेल (रा. वळई, ता. माण) यांनी गावातील गायरानमध्ये असणाऱ्या घरांचे आठ "अ'चे उतारे मिळावेत, म्हणून 7 एप्रिल रोजी सकाळी माहिती अधिकाराचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडे दिला होता. याबद्दलची माहिती मिळताच त्याचदिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल, सरपंचाचा मुलगा सुनील काळेल व विठ्ठल काळेल यांनी तू माहिती अधिकाराचा अर्ज का दिला, असे म्हणत गुरुदास काळेल यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बबन काळेल व सुनील काळेल यांनी गुरुदास यास काठीने, सोपान काळेल याने दगडाने, तर विठ्ठल काळेल याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यात जखमी होऊन गुरुदास याच्या कानातून रक्त येऊ लागले. या मारहाणीत गुरुदास याचे पाकीट व त्यातील रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली. 

दस्त नोंदणीत Social Distancingचा फज्जा; Break The Chainमध्ये शासकीय कार्यालयांत जाण्यास बंदी

या भांडणाची माहिती मिळताच गुरुदास याची बहीण पूनम खोत व आई सुनंदा काळेल या भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही सर्वांनी अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ केली. सुनील याने पूनम यांचा हात पिरगळला, तसेच त्याचवेळी सरपंचाचा दुसरा मुलगा नितीन काळेल याने गुरुदास याला आमच्या विरुद्ध तक्रार दिली, तर जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी गुरुदास याने म्हसवड पोलिसांच्या सूचनेनुसार सातारा येथे शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. त्यानंतर काल त्यांनी संबंधितांविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल, सुनील काळेल, विठ्ठल काळेल व सदाशिव काळेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस हवालदार नंदकुमार खाडे तपास करीत आहेत. 

ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ

साताऱ्यात शनिवार, रविवारी कडक निर्बंध; काय सांगतो जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा सविस्तर..

तासवडे एमआयडीसीत स्थानिकांना कोलदांडा; शिक्षण, अनुभव असतानाही नोकऱ्यांत बाहेरच्यांना संधी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top