सातारा : जिंती भागात दरडग्रस्त चोहोबाजूंनी संकटात

एकीकडे घराकडे घसरलेले डोंगर अन् ढिम्म प्रशासन, तर दुसरीकडे दळणवळण ठप्प होण्याची भीती
 जिंती भागात दरडग्रस्त
जिंती भागात दरडग्रस्तsakal

ढेबेवाडी : गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत भूस्खलन होऊन डोंगर घसरल्याने चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या आणि प्रशासनाने महापुरात रेस्क्यू ऑपरेशन राबवीत सुरक्षितस्थळी हलविलेल्या जिंती (ता. पाटण) विभागातील जितकरवाडी व वाड्यावस्त्यांतील कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत वर्षभरात कार्यवाही झालेली नाही. तेथील तुटलेल्या पुलावर तातडीच्या संपर्कासाठी उभारलेला लोखंडी सांगाडाही यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.

जिंती व निगडे परिसरातील जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडीत गेल्या वर्षी जुलैमध्ये पावसाचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे डोंगर घसरून दरडी कोसळायला लागल्याने प्रशासनाने तेथे रेस्क्यू ऑपरेशन राबवत अडकून पडलेल्या अनेक कुटुंबांना जिंती व ढेबेवाडी येथे सुरक्षित ठिकाणी हलवले होते.

मंगल कार्यालय, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महिना- सव्वा महिने मुक्काम केल्यानंतर दरडग्रस्त कुटुंबे आपापल्या गावी परतली. त्यावेळी मिळालेल्या आश्वासनांमुळे पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ सुटेल, असा विश्वास त्यांना होता. मात्र, तसे झाले नाही. प्रशासनाकडून त्याच परिसरातील गावाजवळच्या काही जमिनी दरडग्रस्तांना पुनर्वसनासाठी दाखविण्यात आल्या; परंतु पुढे अपेक्षित कार्यवाही अजून तरी झालेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुन्हा ही कुटुंबे धास्तावली आहेत.

गेल्या वर्षी गावाजवळचा वांग नदीवरील पूल पुरात तुटल्याने तेथे लोखंडी अँगलचा तात्पुरता पायपूल तयार केला होता. यंदा मराठवाडी धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येणार असल्याने पावसाळ्यात पुलाचा सांगाडा बुडून वाहून जाण्याची भीती आहे.

अनेकांनी गाठली मुंबई...

जिंती परिसरातील अनेक जण पोटापाण्यासाठी मुंबईस असतात. गेल्या वर्षी पावसाळ्यात गावाकडे दरडी कोसळण्याच्या आणि डोंगर खचण्याच्या घटना घडल्याने काळजीने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला होता. गावाकडे मोबईलला रेंज नसल्याने संपर्कही होत नव्हता. यंदाही पुनर्वसनाचा ठावठिकाणा दिसत नसल्याने काळजीपोटी अनेक मुंबईकरांनी गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांना मुंबईला नेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com