esakal | निरक्षर आईच्या मुलीने दहावीत मिळवले 97 टक्के गुण
sakal

बोलून बातमी शोधा

karad

मुळात तिची आई निरक्षर. रोज शेतात राबणारी. तिचे वडील अतीत गावालगत असलेल्या एका कंपनीत हेल्परचे काम करतात. ही पार्श्‍वभूमी असतानाही श्रद्धा जगतापने दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबाचा लौकिक वाढविला आहे. 

निरक्षर आईच्या मुलीने दहावीत मिळवले 97 टक्के गुण

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : आई अगदीच निरक्षर. शेतात मजुरी करणारी. वडीलदेखील हेल्पर. मात्र, या कौटुंबिक पार्श्वभूमीला बाजूला सारत श्रद्धाने दहावीत तब्बल 97 टक्के गुण मिळविले आहेत. तिचे हे कौतुकास्पद यश सध्या चर्चेचा विषय बनले आहे. 

श्रद्धा सुनील जगताप ही या यशाची मानकरी. सातारा तालुक्‍यातील अतीत हे तिचे गाव. गावातील रणजित गडोख कौर खालसा महाराष्ट्र विद्यालयाची ती विद्यार्थिनी. श्रद्धाची कौटुंबिक पार्श्वभूमी बेताची. मुळात तिची आई निरक्षर. रोज शेतात राबणारी. तिचे वडील अतीत गावालगत असलेल्या एका कंपनीत हेल्परचे काम करतात. अर्थात श्रद्धाने आपल्या यशाने कुटुंबाचा लौकिक वाढविला आहे. दहावीच्या परीक्षेत तिला 97 टक्के गुण मिळाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे तिचे हे यश केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नाही. वक्तृत्वाच्या प्रांतातही ती सातत्याने आघाडीवर राहिलेली आहे. विविध स्पर्धांतून तिने भरीव यश संपादन केले आहे. परिपाठावेळी उत्तम वाचन कौशल्याच्या बळावर तिने सर्वच विद्यार्थी, शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांच्यासह प्रतिभा बर्गे, जया चौगुले, अनुराधा कोडगुले, रविराज निकम आदी शिक्षकांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. उल्लेखनीय म्हणजे थोर देणगीदार एच. एस. गडोख हे एका कार्यक्रमानिमित्त विद्यालयात आले होते. श्रद्धाचे वक्तृत्व ऐकून ते भारावून गेले. या वेळी त्यांनी आपल्या मातोश्री (कै.) रणजित कौर यांच्या स्मरणार्थ 11 लाख रुपयांची देणगी विद्यालयास दिली. ही देणगी त्यांनी श्रद्धाच्या हस्ते स्वीकारायला सांगितली. याच श्रद्धाने अभ्यासातही आपण मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


श्रद्धाची हुशारी आम्ही सारे शिक्षक आरंभापासून जाणून होतो. ती पुढे नक्कीच चमकणार, याचीही आम्हाला खात्री होती. या यशामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. 

- प्रतिभा बर्गे, शिक्षिका, रणजित कौर गडोख विद्यालय, अतीत 

(संपादन ः संजय साळुंखे) 

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार

loading image