
Satara : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीपर्यंत आंदोलन मागे नाही
पाटण : धरणग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाचा आज २४ वा दिवस आहे. कोयनासह बामणोली, कोल्हापूर येथे धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. बामणोली येथे आंदोलनस्थळी जाताना मला पालकमंत्री शंभूराज देसाईंचा फोन आला.
आंदोलन मागे घ्यावे, असे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले आहे. पालकमंत्री देसाई येत्या सोमवारी कोयनानगर येथे येणार आहेत. त्यादिवशी चर्चा काय होते व बैठकीबाबत नियोजन कसे होईल, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी ठाम भूमिका श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आज जाहीर केली.
दरम्यान, आज गुढीपाडव्यानिमित्ताने आंदोलनस्थळी धरणग्रस्तांनी गुढी उभारून सण साजरा केला. पालकमंत्री देसाई यांच्याबरोबर फोनवर चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी त्यांची कोयना धरणग्रस्त उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत माहिती दिली. या समितीत मंत्री सुरेश खाडे यांचा समावेश असून, आपण प्रश्न सोडवू शकतो, असे सांगितले. मात्र, मी बैठक लावायला सांगितले होते. बैठक लागली नसल्यामुळे लोक आंदोलनाला बसले आहेत, अशी माहिती दिल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
अन्यायकारक शासन निर्णय झाले आहेत. त्यामध्ये दुरुस्तीसाठी धरणग्रस्त आंदोलन बसले आहेत. हा अध्यादेश राज्यातील सर्व धरणग्रस्तांना लागू आहे. याबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक झाली पाहिजे, असे देसाई यांना सांगितल्याचे पाटणकर म्हणाले. तुम्ही आंदोलन स्थळी धरणग्रस्तांना भेटायला येऊन आंदोलकांशी संवाद साधावा.
त्यांचे गाऱ्हाणे ऐकावे, लोक स्वतःहून आंदोलनास बसले आहेत. मी त्यांच्या सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावर देसाई यांनी येत्या सोमवारी (ता. २७) धरणग्रस्तांना भेटू, असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री स्तरावर बैठक लागण्यापूर्वी प्रधान सचिवांची बैठक लागली पाहिजे, हा प्रश्न फक्त कोयना धरणग्रस्तांचा नसून राज्यातील सर्व सुमारे सात लाख धरणग्रस्तांचा आहे. मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर बैठक होणार असेल, तर त्याचे स्वागत आहे. मंत्री, अधिकाऱ्यांत समन्वय नाही. कोणत्या विषयावर आंदोलन आहे, हे मंत्र्यांना कळत नाही. ही खेदजनक बाब आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. २४ दिवसांत उच्चाधिकार समितीने माहिती घेतली नाही किंवा प्रशासनाने माहिती दिली नाही. ही शोकांतिका आहे, अशी खंत डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केली.
आज आंदोलनस्थळी गुढी उभारली असून, संघर्षातून विजय मिळवू त्याचे गुढी प्रतीक असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस श्रमिक मुक्ती दलाचे सचिन कदम, श्रीपती माने, महेश शेलार, सीताराम पवार, विनायक शेलार उपस्थित होते.