सातारा ‘मराठवाडी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

तब्बल २५ वर्षांनंतर धरणाचे बांधकाम पूर्ण
 Marathwadi
Marathwadisakal

ढेबेवाडी : तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेले मराठवाडी धरणाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत धरणस्थळी पाहणी करून माहिती घेतली.

कधी धरणग्रस्तांचा विरोध, तर कधी निधीचा तुटवडा यामुळे १९९७ पासून अडथळ्यांची शर्यत पार करत आलेल्या मराठवाडी धरणाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याने लाभक्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यांत या धरणाचे लाभ क्षेत्र असून, टेंभू योजनेलाही त्यातून एक टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार कंपनी युनिटी एशियनसाठी

के. जे. इन्फ्राचे अध्यक्ष के. जे. जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकल्पाचे बांधकाम मार्गी लावले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश आहे. यंदा धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजे २.७३ टीएमसी पाणीसाठा होणार आहे. तत्पूर्वी धरणाचे एकूण बांधकाम, आपत्कालीन व इतर उपाययोजना, सुविधांबाबत जिल्हाधिकारी सिंह यांनी आज सकाळी धरणस्थळी भेट देऊन पाहणी केली. अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, शाखा अभियंता निखिल खांडेकर, उपअभियंता हर्षवर्धन भोसले, प्रियांका वाघमारे, रोहिणी कुलकर्णी, प्रकल्प अभियंता व व्यवस्थापक संदीप मोरे, महादेव कारंडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण धरण परिसर फिरून माहिती घेतली. धरणाचे गेट, सायरन, आपत्कालीन व्यवस्था याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या वेळी पुनर्वसित गावठाणातील सुविधांच्या कामांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी करून आवश्यक सूचना दिल्या. प्रकल्प व्यवस्थापक संदीप मोरे यांनी धरणाच्या बांधकामाबद्दलची माहिती सांगितली. दौऱ्यानंतर कार्यकारी अभियंता सुरेन हिरे म्हणाले, ‘‘धरणग्रस्तांचे काही शिल्लक प्रश्न एकत्रित करण्यात आले असून, ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने येत्या ३० तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सातारा येथे बैठकीचे नियोजन आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com