लॉकडाउन व अतिवृष्टीने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट

अरुण गुरव
Thursday, 17 September 2020

लॉकडाउनमुळे बाजारपेठ न मिळाल्याने व आता अतिवृष्टीने पाटण तालुक्‍यात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

मोरगिरी ः लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळाला नाही. आता अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. पाटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली असून, त्यातून उभारी घेण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. 

लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेल्या कलिंगडे, काकडी, दोडका, कारली, ढब्बू मिरची, वांगी भेंडी, गोसावळे या मालाला बाजारपेठ मिळाली नाही. शेतमाल घरात सडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कोरोना आजाराच्या साथीमुळे मुंबईकर चाकरमनी गावी आल्यामुळे त्यांचा हात शेतीला जुंपले. पडीक रानेसुद्धा त्यांनी पिकाखाली आणले. त्यामुळे यावर्षी पिकांचे उत्पादन वाढेल, असा विश्वास त्यांना वाटू लागला; परंतु अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. खरीप हंगाम घेतलेले पावटा, दारकू, घेवडा, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, ऊस ही पिके वाया गेल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शिवारामध्ये बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. 

वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. वन विभाग आणि कृषी विभागाने धडक मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. 

वन्यप्राण्यांचे पशुधनावरही हल्ले 
पशुधन हे येथील शेतकऱ्यांचे अर्थाजनाचे प्रमुख साधन आहे. पाटण तालुक्‍यातील डोंगर पठारावरील पशुधन वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे धोक्‍यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये गाय, शेळी, म्हैस हे मृत्युमुखी पडत आहेत. पाळीव जनावरांबरोबर ग्रामस्थांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. अर्थाजनाचे प्रमुख साधन असलेला पशुधन डोळ्यादेखत मरताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. 

संपादन ः संजय साळुंखे 

 

साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर शुक्लकाष्ठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Double crisis for farmers due to lockdown and heavy rains