अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्‍यात सोडल्या शेळ्या-मेंढ्या, शेतकरी हवालदिल

Satara
Satara

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात यंदा निसर्गाने शेतकऱ्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. प्रारंभी कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या. मात्र, नंतर सतत झालेल्या दमदार पावसाने शिवारात डौलदार पिके डोलू लागलेली आहेत. पण, पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वळई येथील विजय काळेल या शेतकऱ्याने मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने दोन एकर मका पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत. 

तालुक्‍यात सध्या उडीद, मूग आणि मका पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे पिके धोक्‍यात आली आहेत. शेतकऱ्यांनी उडीद, मूग, मक्‍यावरील रोग कमी करण्यासाठी महागडी औषधे खरेदी करून फवारणी करत आहेत. महागडी औषध फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांवर पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. 

चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मका पिकावर लक्ष केंद्रित केलेले आहे. सध्या मका पिकातील तण काढणे, कोळपणीची कामे सुरू आहेत. पण, सुरवातीपासून शेतकऱ्यांनी खते, मशागत, पेरणी व बियाण्यावर एवढा खर्च करूनही हातची पिके गमावून बसण्याची वेळ शेतकरी वर्गावर आलेली असल्याने शेतकरी चांगला खचलेला आहे. त्यातच मागील काही दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बाजरीचे पीक भुईसपाट झाले होते. त्याचेही पंचनामे अद्याप न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटलेला आहे. काही जणांचे बाजरीचे पीक गेले आहे. त्याबरोबर अळीचा प्रादुर्भाव असल्याने इतर पिकेही जाण्याची वेळ आली आहे. 


""सध्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. पिकात कामगंध सापळा लावून अळीचा कितपत प्रादुर्भाव होतो, याचा अंदाज घेऊन फवारणीचे मार्गदर्शन करत आहोत. योग्य काळजी घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.'' 
-अनिल माने, कृषी सहायक, वळई 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com