पाटण भूमिअभिलेख कार्यालयात तब्बल निम्मी पदे रिक्त

जालिंदर सत्रे | Saturday, 29 August 2020

पाटणमधील भूमिअभिलेख कार्यालयातील मंजूर आस्थापनातील 22 पदांपैकी तब्बल दहा पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्याचबरोबर कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही जास्त आहे. 

पाटण (जि. सातारा) ः भूमिअभिलेख कार्यालयातील मंजूर आस्थापनातील 22 पदांपैकी दहा पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. कार्यालयप्रमुखाचा कारभार गेली पाच वर्षे अतिरिक्त कार्यभारावर चालला आहे. मोजणीची 832 प्रकरणे प्रलंबित असल्याने जनतेला हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाने त्वरित रिक्त पदे भरावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

पाटण तालुक्‍यात मूळ 205 व वाडी विभाजन झालेली 138 गावे आहेत. एकत्रिकरण पूर्ण झालेली 126 गावे व नगर भूमापन योजना लागू असणारी 24 गावे आहेत. एकत्रिकरण केलेल्या गावांची संख्या 79 असली तरी 1992 पासून या योजनेला स्थगिती असल्याने एकत्रिकरणाची कामे प्रलंबित आहेत. 

पाटण तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र एक लाख 40 हजार 235 हेक्‍टर असून पाच ते दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या खातेदारांची संख्या लक्षणीय आहे. एवढा सगळा कामाचा भार सांभाळण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडे कागदोपत्री 22 पदे मंजूर आहेत. त्यापैकी नऊ पदे रिक्त व एक कायमस्वरूपी गैरहजर अशी परिस्थिती आहे. भूमिअभिलेख कार्यालयात भूकरमापक व शिपाई प्रत्येकी दोन पदे अशी चार, निमतानदार क्रमांक-दोन, छाननी लिपिक, कनिष्ठ लिपिक, अभिलेखपाल, दप्तरबंद ही पाच पदेही रिक्त आहेत. कार्यालयप्रमुख पद हे 25 ऑगस्ट 2016 पासून रिक्तच आहे. त्यापासून आजपर्यंत इतर तालुक्‍यांतील अधिकाऱ्यांकडे पदभार असतो. आठवड्यातून दर बुधवारी ते येऊन कारभार करतात. 14 जणांनी पाच वर्षांत अतिरिक्त कारभार पाहिला आहे. नगरभूमापन योजना लागू झालेली 24 गावे आहेत. यासाठी स्वतंत्र कार्यालय असते. मात्र, या कार्यालयाचा भारही सहन करावा लागतो. नगरभूमापनसाठी एकच कर्मचारी असून, तोच साहेब, शिपाई व कर्मचारी अशी भूमिका बजावत असतो. 

साधी, तातडीची व अति तातडीची असे मोजणीचे प्रकार असून, त्याचे एक, दोन व तीन हजार असे शुल्क आकारले जाते. रिक्त पदांमुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होत नाही. प्रत्येक महिन्याला या प्रलंबित प्रकरणात 60 ते 70 मोजणी प्रकरणांची भर पडत आहे. न्यायालयीन प्रकरणांनाही त्यामुळे न्याय मिळत नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प व गावागावांतील राजकीय व भावाभावांतील हद्दीच्या वादामुळे मोजणी प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर स्कीम, मिळकत पत्रिका, चौकशी नोंद, टिपण, आकारबंद, कमी-जास्त पत्रक, कब्जादार यादी, कब्जा पावती व जबाब उताऱ्यांची नक्कल आणि मोजणी, गट व सर्व्हे नंबर नकाशा नक्कल ही कागदपत्रे काढण्यासाठी येणारांना दिवस-दिवस कर्मचारी नसल्याने बसावे लागते. यासाठी महिनाभर हेलपाटे मारणारेही पाहावयास मिळतात. 

मोजणीसाठी एक हजार 28 प्रकरणे 
पाटण कार्यालयात सध्या मोजणीसाठी एक हजार 28 प्रकरणे आहेत. त्यात नियमित मोजणीची 349, तातडीची 268 व अति तातडीची 180 व इतर प्रकरणांचा समावेश आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, खातेदारांची संख्या जास्त आणि हजर कर्मचारी सजा म्हणून पाटणला बदली, अशी मानसिकता घेऊन आलेले असतात. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल 

 

पुणे पदवीधर, शिक्षकच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार विजयकुमार देशमुखांचा होम टू होम प्रचार 
सहस्त्रार्जून प्रशालेत बैठक  उमा नगरी येथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या नंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी श्रीशैल नगर येथील श्री सहस्त्रार्जुन प्रशालेचे भेट देऊन तेथील शिक्षकांची बैठक घेतली. या बैठकीस संस्थेचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर, सेक्रेटरी अनिल रंगरेज, गुलाबचंद बारड, प्रा. भगवंत उमदीकर, महेश मेंगजी, गणेश चवटे, बलभिम कोल्हापुरे, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी आमदार देशमुख यांनी पदवीधर व शिक्षक मतदारांनी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले.