निवारा शेडमध्येच त्यांनी थाटले संसार

patan
patan

ढेबेवाडी (जि. सातारा) : पावसाला फारसा जोर नसल्याने मराठवाडी धरणातील पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. मात्र, गेल्या वर्षी पावसाळ्यात ऐन वेळी उडालेल्या तारांबळीचा अनुभव गाठीला असल्याने धरणांतर्गत उमरकांचन (ता. पाटण) येथील धरणग्रस्त कुटुंबांनी निवारा शेडमध्ये संसार हलवायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा आणखी वाढणार असल्याने पाटबंधारे विभागाने धरणग्रस्तांसाठी निवारा शेडची व्यवस्था केलेली आहे. 

मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील मेंढ व उमरकांचनमधील शिल्लक धरणग्रस्त कुटुंबांच्या मागणीनुसार धरणाच्या जलाशयापासून वर सरकून तीन पुनर्वसित गावठाणे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातील उमरकांचन येथील धरणग्रस्तांच्या गावठाणात घरबांधणीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. गेल्या वर्षी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम सुरू केल्याने पाणीसाठा 0.60 टीएमसीवरून 1.05 टीएमसी झाल्याने अनेक मंदिरे, घरे, पाणीपुरवठ्याच्या विहिरी, स्मशानभूमी पाण्यात गेली होती. त्यामुळे भर पावसात निवारा शेडची उभारणी करून त्यामध्ये काही कुटुंबांना स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आलेली होती. सांगली जिल्ह्यात पुनर्वसनाचे नियोजन असलेली; परंतु प्रलंबित मागण्यांमुळे मूळगावी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचाही त्यात समावेश होता. यंदाच्या पावसाळ्यात धरणाची पाणीपातळी आणखी वाढून 649 मीटरपर्यंत पोचण्याची श्‍यक्‍यता आहे. 

उमरकांचन व मेंढ येथील घरांना पाण्याचा वेढा पडणार असल्याने पाटबंधारे विभागाकडून धरण परिसरात निवारा शेडची तजवीज करण्यात आलेली आहे. शंभरपैकी बहुतांश शेड उभीही राहिली असून, त्यात धरणग्रस्त कुटुंबानी स्थलांतराला सुरुवात केली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये तट्टे लावून पार्टीशन करण्यात आले असून, वीजपुरवठ्याचीही व्यवस्था केलेली आहे. गेल्या वर्षी शेडमध्ये पाणी घुसल्याने धरणग्रस्तांना तेथे राहणे अवघड बनले होते. या पार्श्वभूमीवर नवीन शेडमध्ये जमिनीपासून उंचावर फाउंडेशन, पायऱ्या, तसेच बाजूने चर करून काळजी घेतल्याचे सहायक अभियंता शरद पवार यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ऐन वेळी उडालेल्या तारांबळीचा अनुभव गाठीला असल्याने धरणग्रस्त कुटुंबांनी निवारा शेडमध्ये संसार हलवायला सुरुवात केली असून, नव्या ठिकाणी संसार मांडून चुलीही पेटल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com