
Satara : भरपाईच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा ; अतिवृष्टी बाधितांना सतरा कोटींची मदत
सातारा : गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील २४ हजार ७५४ शेतकऱ्यांना १७ कोटी चार लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षातील सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती. यात खरीप पिकांसह नगदी पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतातील पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले होते. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठविले होते. मात्र, पाच ते सहा महिने उलटले तरी याबाबत कोणतीही मदत मिळाली नव्हती. याबाबत दै. ‘सकाळ’ने जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.
भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. याची दखल घेऊन शासनाने तब्बल पाच ते सहा महिन्यांनी पुणे व नाशिक विभागांतील सहा लाख ३२ हजार ८९२ शेतकऱ्यांना तब्बल ६७५ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये तीन हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २७ हजार व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६ हजार रुपये या वाढीव दराप्रमाणे देण्यात येणार आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील एक लाख ९४ हजार ५५० शेतकऱ्यांच्या एक लाख एक हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २१६ कोटी ४६ लाख एक हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील २४ हजार ७५४ शेतकऱ्यांना १७ कोटी चार लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वाढीव दराने मिळणार मदत...
यापूर्वी जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसान भरपाईची रक्कम मिळत होती, तर वाढीव दराने १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, तर वाढीव दराने २७ हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी १८ हजार, तर वाढीव दराने ३६ हजार रुपये मिळतील.