पावसाचा डोस; तीन लाख हेक्‍टरवरील पिके तरारली!

हेमंत पवार
Thursday, 6 August 2020

गेल्या महिन्याहून अधिक काळ पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी पिके पिवळीही पडली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

कऱ्हाड (जि. सातारा) ः शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने खरीप हंगामात घेतलेली पिके जून महिन्यातील पावसावर उगवून आली. मात्र, त्यानंतर पावसाने महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने उगवलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. काही ठिकाणी पिके पिवळीही पडली होती. त्यांना मोठ्या पावसाची आवश्‍यकता होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खरिपातील सुमारे तीन लाख हेक्‍टरांवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

कृषी विभागाच्या दप्तरी खरिपाचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची नोंद आहे. खरीप हंगामात ऊस वगळून जिल्ह्यात तीन लाख 52 हजार 76 हेक्‍टर क्षेत्र हे पेरणीलायक आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ऊस या पिकाचे क्षेत्र मोठे असते. मात्र, शेतकरी खरीप हंगामात पावसावर येणाऱ्या पिकांनाही महत्त्व देतात. त्यांच्याकडून दरवर्षीच्या खरिपात भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, मका यांसह कडधान्य आणि तृणधान्याची मोठ्या प्रमाणात लागण करतात. यंदा मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात वळिवाचे पाऊस चांगले झाले. त्यावर शेतकऱ्यांनी मशागती उरकल्या. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील अतिपावसाच्या परिसरातील काही शेतकरी धूळवाफ पेरण्या करतात. त्या जूनच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण झाल्या. उर्वरित शेतकऱ्यांनी पडलेल्या पावसावर पेरण्या केल्या. 15 जूनपासून मॉन्सूनच्या पावसाची रिपरीप सुरू झाली. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके वाया जाण्याच्या मार्गावर आली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी पिके पिवळी पडली होती. गेल्या तीन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. 

सातारा जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस खरिपातील पिकांसाठी उपयुक्त ठरला आहे. मात्र, खरिपातील पिकांसाठी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. 

- विजय राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

या गावात हॉस्पिटलसमोरच कोरोना बाधिताचा तडफडत मृत्यू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Hevy rain; Crops on three lakh hectares flourished!