
Satara : लंडनमध्ये मिळाला भारतीय युवकाला पासपोर्ट
कऱ्हाड : नोकरीसाठी अमेरिकेला विमानाने जात असताना जांब बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील रोहित निकम याचा पासपोर्ट विमान लंडन विमानतळावर थांबले असताना गहाळ झाला. त्यामुळे त्याला अमेरिकेत जाता येत नव्हते.
त्याच्या पालकांनी तातडीने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लंडनमधील दुतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करुन तातडीने पासपोर्ट देण्यासाठीची कार्यवाही केली. त्यामुळे रोहितला दुसऱ्याच दिवशी लंडन विमानतळावर पासपोर्ट मिळाला. त्यामुळे त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जांब बुद्रुक येथील रोहीत शशिकुमार निकम हा युवक अमेरिकेत नऊ वर्षापासुन नोकरीसाठी आहे. ते सध्या मुंबईत स्थायीक आहेत. तो गावी येवुन अमेरिकेला विमानाने शनिवारी (ता. 18) निघाला होता.
त्यादरम्यान त्या विमानाचा एक हॉल्ट हा लंडन विमानतळावर होता. तेथे वेळ लागणार असल्याने तो विमानतळावरील फुड स्टॉलवर कॉफी घेण्यासाठी गेला. काहीवेळाने तो पुन्हा विमानात जाण्यासाठी बोर्डींग पास घेवुन निघाला. त्यादरम्यान आपल्याकडे पासपोर्ट नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने सर्व बॅगमध्ये तपासणी करुनही तो पासपोर्ट सापडला नाही. त्यामुळे त्याला विमानातुन अमेरिकेला जाता आले नाही.
त्याची माहीती त्याने तेथील विमानतळ यंत्रणेला दिला. त्यानंतर त्यांनी लंडन येथील दुतावासाला कळवले. तेथुन रोहितच्या वडिलांना त्याची माहिती देण्यात आली. रोहितच्या वडिलांसमोर हा नवीनच संकटाचा प्रसंग होता. त्यांनी न डगमगता मोठ्या धैर्याने आपले बंधु सुधाकर निकम यांच्या सहकार्याने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला. खासदार पाटील यांनी त्याची माहिती घेवुन
तातडीने लंडनमधील भारतीय दुतावासातील हाय कमीश्नर आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र मेल केले. परराष्ट्र मंत्रालयानेही त्याची दखल घेवुन तातडीने पावले उचलली. रविवारी (ता. 19) सुट्टी असल्याने रोहितला लंडनमध्येच थांबावे लागले.
त्यादरम्यान त्याला लंडनमधील भारतीय दुतावासकडून तेथे बोलावणे झाले. रोहितने लंडनमधील भारतीय दुतावासात जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून तात्पुरती परवानी घेतली. त्यानंतर तो भारतीय दुतावासात गेल्यावर त्याला तेथे खासदार पाटील आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीवरुन सोमवारी (ता. 20) त्याला पासपोर्ट देण्यात आला.
मात्र त्या पासपोर्टवर व्हीजाचे स्टीकर आणि शिक्का नव्हते. त्यामुळे त्याला तेथुन अमेरिकेला जाता आले नाही. मात्र तो लंडनमधुन संबंधित कागदोपत्री कार्यवाही पुर्ण करण्यासाठी भारतात येण्यासाठी निघाला आहे. पासपोर्टची कागदोपत्री कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर तो पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहे. खासदार पाटील यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका युवकाला मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांचे निकम कुटुंबीयांनी सत्कार करुन त्यांचे आभार मानले.
खासदार पाटील यांचे आवाहन
भारतीय नागरीकांनी परदेशी जाताना किंवा परदेशातुन मायदेशात येताना पासपोर्टची जिवापाड काळजी घेतली पाहिजे. पासपोर्ट बॅगेत ठेवल्यास ती बॅग चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पासपोर्ट बॅगेत न ठेवता अंगाभोवतीच राहील याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर विमानतळावर इतरत्र कुठेही फिरताना तो पासपोर्ट गहाळ होणार नाही याची पुर्णतः दक्षता घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी परदेशीस्थ भारतीय नागरीकांना केले आहे
ज्याला काही नसते त्याची काय अवस्था होत असेल याची मला लंडन विमानतळावर जाणीव झाली. माझ्यासाठी खासदार देव म्हणुनच उभे राहिले. त्यांच्यामुळे मला तातडीने लंडन विमानतळावर पासपोर्ट मिळण्याची व्यवस्था झाली. त्यांच्या मदतीमुळे मला लडनंडहुन भारतात येईपर्यंत काहीही अडचण आली नाही. त्यांचे मोठे सहकार्य मला लाभले.
रोहित निकम