esakal | शेतातील मातीपासून बनविलेल्या बाप्पांच्या मूर्तींची अनेक घरांत प्रतिष्ठापना!
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

शेतातील मातीपासून बनविलेल्या बाप्पांच्या मूर्तींमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेला हातभार लावण्याबरोबरच निर्मितीचा आनंदही आम्ही सर्वांनी घेतल्याचे बंदमुळे मुंबईहून गावी आलेले व्यावसायिक व अभिनेते सचिन पाटील, अनिल पुजारी, रमेश पुजारी आदींनी सांगितले. 

शेतातील मातीपासून बनविलेल्या बाप्पांच्या मूर्तींची अनेक घरांत प्रतिष्ठापना!

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : जंगलाच्या कुशीत वसलेल्या निवी (ता. पाटण) येथील अनेक घरांत बालगोपाळ व युवकांनी शेतातील मातीपासून बनविलेल्या बाप्पांच्या मूर्तींची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने डोंगरकपारीतील तांबड्या मातीत लपलेल्या अनेक माणिक-मोत्यांच्या अंगच्या कारागिरीला अनोखी झळाळी तर मिळाली आहेच, शिवाय पर्यावरण रक्षणाचा संदेशही त्यातून समाजात पोचवला आहे. 

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर घनदाट जंगलाच्या परिसरात वसलेली निवी वन्य प्राण्यांच्या उपद्रवासह विविध समस्यांशी पावला-पावलांवर सामना करत आहे. गावातील बहुसंख्य लोक पोटापाण्यासाठी मुंबईस असतात. कोरोनाचा फैलाव वाढल्याने पाच महिन्यांपासून त्यापैकी अनेकजण गावाकडेच आहेत. मुंबईसह ढेबेवाडी, कऱ्हाड परिसरातील शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणारे तेथील विद्यार्थीही घरीच आहेत. मोकळा वेळ असल्याने सुरवातीला यातील काही जणांना गणेशमूर्ती बनविण्याची कल्पना सुचली. त्यांनी मोकळ्या वेळेत शेतातून माती आणून मूर्ती सकारायला सुरवात केली. हळूहळू संख्या वाढत गेली आणि अनेक हौशी हात कारागिरीत गुंतले.

मूर्तींना तडे जावू नयेत म्हणून ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनानुसार माती दोन दिवस भिजवणे, भाजून घेणे, मूर्तीत नारळाची केसर भरणे आदी उपायही त्यांनी अवलंबले. काहींनी ऑइलपेंट, काहींनी पोष्टर व बाजारातील अन्य उपलब्ध रंगांचा वापर करत मूर्तींचे रंगकाम करत लेस व उपलब्ध अन्य साहित्यांनी त्यांना सजवले. दीड-दोन फूट उंचीपर्यंतच्या विविध रूपांतील बाप्पांच्या या मूर्तींची काल अनेक घरांत भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली असून, या निमित्ताने पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेला हातभार लावण्याबरोबरच निर्मितीचा आनंदही आम्ही सर्वांनी घेतल्याचे बंदमुळे मुंबईहून गावी आलेले व्यावसायिक व अभिनेते सचिन पाटील, अनिल पुजारी, रमेश पुजारी आदींनी सांगितले. 


""दरवर्षी बाजारपेठेच्या गावातून ग्रामस्थ गणेशमूर्ती आणायचे. मात्र, यंदा बऱ्याच घरांत मुलाबाळांनी शेतातल्या मातीत कलाकुसर भरत, जीव ओतून बनविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.'' 

-मारुती पाटील, 
अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, निवी 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

loading image
go to top