काळजी घ्या... केळघर घाट देतोय अपघातांना निमंत्रण

केळघर घाट
केळघर घाट

केळघर (जि. सातारा) :  काळा कडा ते महाबळेश्वर पर्यंत रस्त्याचे काम चांगले झाले आहे. मात्र केवळ पाच ते सहा किलोमीटर रस्त्याचे काम ठेकेदाराच्या धिम्या पद्धतीने चर्चेत आले आहे. लॉकडाउन तसेच पावसाने उघडीप दिल्याने ठेकेदाराने हे काम गतीने उरकून घेणे गरजेचे होते. मात्र ठेकेदारावर कोणाचाही अंकुश नसल्याने मनाला वाटेल तसे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने घाट रस्त्यावर दरडी येत आहेत. त्यामुळे निदान एका बाजूने तरी रस्ता पूर्ण करणे आवश्‍यक होते. मात्र दोन्ही बाजूने रस्ता उकरल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. 

गेले वर्षभर या घाटातील काम सुरू आहे. काही ठिकाणी एका बाजुचे कॉंक्रिटचे काम झाले असले तरी पहिल्याच पावसात दरडी कोसळल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येवून चिखल होत आहे. तर दुसऱ्या बाजूने वाहन चालवणे म्हणजे आपघातालाच निमंत्रण दिल्यासारखे आहे. 

बऱ्याच ठिकाणी रस्त्याकडेच्या मोऱ्यांचा भाग तुटून गेला आहे तर अनेक ठिकाणी रस्त्याला संरक्षण कठडेच नाहीत. तर अनेक ठिकाणी मोऱ्यांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने पावसाच्या पाण्याने सर्वत्र चिखल पसरत आहे. या घाटाची ही पावसापुर्वीची अशी अवस्था असेल तर मोठा पाउस आल्यावर काय? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याशिवाय मोठ्या दरडी रस्त्याकडेच्या नाल्यात तशाच पडून राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे नाहीत. साईडपट्ट्या खचल्या आहेत. अरूंद रस्ता व वेडीवाकडी वळणे अशा स्थितीत केळघर घाटातून वाहन चालवणे म्हणजे चालकांसाठी दिव्य झाले आहे. 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरला साताऱ्याहून मेढामार्गे जाणारा एकमेव केळघर घाट मार्गे आहे. तर कोकणाला सातारा जिल्ह्याशी जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या घाटातून वाहनांची नेहमी वर्दळ असते. याचा विचार करुन संबंधित विभागाने जाणीवपुर्वक या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

वरोशीनजिक मोठा धोका 
केळघर घाट अतिशय तीव्र व वेड्यावाकड्या वळणांचा आहे. पावसात ठिकठिकाणी दरडी कोसळून व साईडपट्ट्याही वाहून जातात. त्यामुळे वाहन धारकांना धडकीच भरते. अनेक ठिकाणी अरूंद रस्ता व काळ्याकडयाच्या वळणावर सुरक्षा कठडा नसल्याने अनेकवेळा आपघात होवून वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर वरोशी दरम्यान एका मोरीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग गेल्या दोन वर्षापासून तूटून गेला आहे. तो अजुनही बांधण्यात आला नाही. पुढे मोठया पावसात उर्वरीत भाग वाहून गेल्यास मोठया अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com