
Satara : खटाव तालुक्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे
कलेढोण : दुष्काळी खटाव तालुक्यात गत दोन वर्षांत झालेल्या समाधानकारक पावसाच्या हजेरीमुळे व गावागावांत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरला ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे दर वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून तालुका प्रशासनाकडून होणाऱ्या टँकरच्या मागणीला पूर्णविराम मिळाला आहे.
खटाव तालुक्यातील मुख्य पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या येरळवाडी, नेर, मायणी, येळीव या तलावांत पाणीसाठा उपलब्ध आहे. गत महिन्यात दुष्काळी पूर्व भागात उरमोडी व तारळीचे पाणी वाटप करण्यात आल्याने ठिकठिकाणचे छोटे तलाव पाण्याने भरून घेतले. गावागावांत नाम फाउंडेशन व पानी फाउंडेशनच्या व गत दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या समाधानकारक पावसाच्या हजेरीमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली.
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आवळे पठार, पाचवड, अनफळे, गारुडी, औताडवाडी या प्रमुख टंचाईग्रस्त गावांकडून होणारी टँकर मागणीला ब्रेक लागला आहे. या गावांचे पाणीटंचाईचे संकट असलेल्या गावात जलसंधारणाची कामेही प्रगतिपथावर आहे.
टेंभूमुळे शेतीपाण्याचा प्रश्नही लागेल मार्गी...
पिण्याच्या पाण्याच्या संकटाबरोबर शेती पाण्याचाही प्रश्न तालुक्यातील गावांत जाणवतो. त्यात जिल्ह्याला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षबागांचा प्रमुख समावेश होतो. शेती पाण्यासाठी परजिल्ह्यातून टँकर मागणीही थंडावली आहे.
दरम्यान, टेंभूचे पाणी तालुक्यातील वंचित गावांना मिळावे, यासाठी शासनाकडून वंचित गावांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामास प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्यास तालुक्यातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीपाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
दर वर्षी फेब्रुवारीपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे प्रस्ताव दाखल होतात. मात्र, गावोगावच्या गावठाणात पुरेसा पाणीसाठा असल्याने गत दोन वर्षांपासून प्रशासनाकडे टॅंकर मागणीचा एकही प्रस्ताव तालुका प्रशासनाकडे दाखल झालेला नाही.
- शंकर झेंडे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग.