कोकणच्या मदतकार्यात खटावकरांचा हातभार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

निसर्ग चक्रीवादळात जमीनदोस्त झालेल्या मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे वीज यंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी महावितरणच्या वडूज विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथील मदतकार्यात अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. 

वडूज (जि. सातारा) : गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड अशा कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 

विजेचे खांब तर पूर्णत: उखडून पडले आहेत. येथील वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तांत्रिक दुरुस्तीसाठी अन्य जिल्ह्यांतून महावितरणचे अधिकारी, अभियंता व कर्मचारी पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यास सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सुमारे पन्नास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत, तेथील मदत कार्यासाठी धाव घेतली आहे. 

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील तावडे, विभागीय कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हणमंतराव ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज विभागातील सहायक अभियंता रूपेश लादे, नितीनराज माने, लाईनमन सुनील गडकरी, संतोष प्रजापती, उमेश इंगळे (वडूज), ज्ञानदेव गुरव (पुसेसावळी) असे सहा कर्मचारीही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. 

निसर्ग चक्रीवादळामुळे शेती, घरे, रस्ते, विजेचे खांब आदींचे झालेले नुकसान पाहून मन विषण्ण होत होते. मात्र लोकांची विजेची झालेली गैरसोय लवकर दूर करण्यासाठी गतीने मदतकार्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. 

मंडणगड तालुक्‍यातील वेलास, बाणकोट, उमरोली आदी डोंगराळ व दुर्गम भागांत हे अधिकारी, कर्मचारी सध्या वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. विजेचे खांब पुन्हा उभे करण्यासाठी सर्वप्रथम वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचेच काम त्यांना करावे लागले. याशिवाय वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने पडत्या पावसात लोखंडी खांबांची खांद्यावरून वाहतूक करण्याचेही आव्हानही पेलून संबंधित कर्मचारी सध्या त्याठिकाणी वीज जोडणीचे काम करीत आहेत. या सर्व कामांना स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

महावितरणतर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विजेचे खांब उभे करणे, वीज वाहक तारांची जोडणी आदी कामे ही डोंगराळ व दुर्गम भागात जाऊनच करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी देखील सकाळी लवकर उठून या मदत कार्याला सुरुवात करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू असते. कोकणातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत नागरिकांची झालेली विजेची गैरसोय लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

वकिलांनाही सरकारकडून हवे विमा संरक्षण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Khatavkar's Contribution In The Relief Work Of Konkan