
सातारा : नाले बुजवून जमीन सपाटीकरण
कास - जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराच्या पश्चिमेकडील पारांबे फाटा ते एकीव या रस्त्याच्या कडेला अनेक धनिकांनी जमिनी खरेदी केल्या असून, या जमिनीत आत जाण्यासाठी मुख्य रस्त्याचे नाले बुजवून टाकले. जमिनीवर अवैधरीत्या उत्खननही केले आहे. या उत्खननामुळे खोदलेल्या जागेतील माती पावसाने वाहून येऊन रस्त्यावर चिखलाचा राडा झाला आहे.
या राड्याने या मार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती. आज सकाळी सकाळी दूध नेणाऱ्या गाड्या, शिक्षक, स्थानिक वाहने यांना त्याचा फटका बसला. अनेक वाहने अडकून पडली. जागा मालकाने उत्खनन करताना नाला बुजवून टाकल्याने पाणी वाहून जाण्यास जागा राहिली नाही. त्यात नुकतेच खोदलेले मातीचे ढिगारे रस्त्यावर वाहून आले. या दुर्गम भागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेहमीच दुर्लक्ष असते. नवीन रस्ते बनवताना ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात; पण त्याची पाहणी होत नाही. नाले, साइडपट्ट्या यांची दुरवस्था, रस्त्यावर खड्डे अशा समस्या असून सातारा, जावळी तालुक्यांच्या सीमेवरील भागाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, तसेच महसूल विभागानेही उत्खनन आदी बाबींवर लक्ष ठेऊन कारवाई करावी, अशी मागणी लोकांमधून होत आहे.
Web Title: Satara Land Leveling Filling Canal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..