'मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही'

राजेश पाटील | Tuesday, 26 January 2021

मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही, असे त्यावेळी ठणकावून सांगणाऱ्या अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे स्वतःचे जीवन संपवले असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली.

ढेबेवाडी (जि. सातारा) : राजकीय विचारांना अलिप्त ठेवून मराठा समाज आणि कष्टकऱ्यांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना केल्याची घोषणा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकतीच केली. गुरुवारी (ता. 28) सातारा येथे फाउंडेशनचे उद्‌घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अध्यक्ष पाटील म्हणाले, "अण्णासाहेब पाटील यांनी पोटापाण्यासाठी मुंबईत हमाली करत असताना माथाडी कामगारांना संघटित करून त्यांना कायद्याचे संरक्षण मिळवून दिले. 1980 मध्ये त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी 22 मार्च 1982 रोजी त्यांनी भव्य मोर्चा काढला होता. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही, असे त्यावेळी ठणकावून सांगणाऱ्या अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे स्वतःचे जीवन संपवले. संपूर्ण महाराष्ट्र अण्णासाहेबांचे कार्य जाणतो. विधान परिषदेवर आणि अण्णासाहेब पाटील महामंडळावर काम करताना हे कार्य पुढे नेण्याची संधी मला लाभली. मराठा समाज काय हाल भोगतोय, हे जवळून बघायला मिळाले. अनेक प्रश्न आहेत. आरक्षणाबाबत न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली जात नाही.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?
 
ईडब्ल्यूएससारखे पर्याय सरकार सुचवत असले तरी त्याने मूळ आरक्षणाला धक्का लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कष्टकरी, माथाडी कामगार व मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून न्याय मिळवून देण्यासह महामंडळाच्या विविध योजना तरुणांपर्यंत पोचवून राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यासाठी, तसेच अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्याच नावाने विकास फाउंडेशनची स्थापना केली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व खासदार संभाजीराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत फाउंडेशनचे उद्‌घाटन होईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (स्व.) यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.'' 

Advertising
Advertising

शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकारच जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात

संपादन : बाळकृष्ण मधाळे