सातारा : मराठवाडी धरण करणार रिकामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dam

सातारा : मराठवाडी धरण करणार रिकामे

ढेबेवाडी: तब्बल २५ वर्षांनंतर पूर्णत्वाकडे आलेल्या मराठवाडी धरणाच्या इंटेकवेलमधील आपत्कालीन दरवाजा, तसेच बोगद्यातील अन्य कामे पूर्ण करण्यासाठी १५ एप्रिलला धरण रिकामे करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. तेथून पुढे पावसाळ्यापर्यंत लाभक्षेत्रातील म्हणजे कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील शेतकऱ्यांना वांग नदीत उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अगदी काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

टेंभू योजनेसह कऱ्हाड व पाटण तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या मराठवाडी धरणाचे १९९७ पासून सुरू असलेले बांधकाम अनेक अडथळे पार करत अखेर पूर्णत्वाकडे आलेले असून, यावर्षीच्या पावसाळ्यात त्यामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजे २.७३ टीएमसी पाणीसाठा होईल, असा अंदाज आहे. या धरणाची अंशतः घळभरणी झाल्यापासूनच लाभक्षेत्रातील शेतीत चांगले बदल झाल्याचे दिसून येत असून, पाणी साठवण वाढेल तशी बागायती क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट असलेल्या मराठवाडी धरणातील सुमारे एक टीएमसी पाणी टेंभू योजनेला पाठविण्यात येणार असल्याने तेथे पुनर्वसित धरणग्रस्तांच्या शेतीलाही त्याचा लाभ होणार आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात कऱ्हाड व पाटण तालुक्यांत नदीवर ठिकठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी साठवण करण्यात येते. त्यासाठी धरणातून मागणीनुसार आवर्तने सुरू असतात. सध्या धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. इंटेकवेलमधील आपत्कालीन दरवाजा, तसेच बोगद्यातील जाळी व अन्य कामे करण्यासाठी धरण मोकळे करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असून, १५ एप्रिलपर्यंतच धरणातून पाणी सोडणे शक्य होणार असल्याने तेथून पुढे पावसाळ्यापर्यंत लाभक्षेत्रातील म्हणजे कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील शेतकऱ्यांना वांग नदीत उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा अगदी काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

ज्या महिंद व साखरी या धरणांतील पाण्यावर मराठवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. ती दोन्ही धरणे छोटी असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर हाच त्यावर उपाय ठरू शकतो. कार्यकारी अभियंता सुरेन हिरे म्हणाले, ‘‘मध्यंतरीच्या अतिवृष्टीत काही बंधाऱ्याचे नुकसान झालेले आहे. त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापूर्वी ३० मार्चला धरण रिकामे होणार असल्याचे सांगितले होते; परंतु दुरुस्त्या व भराव व्यवस्थित होण्यासाठी आणखी १५ दिवस वाढविले आहेत. साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत धरण रिकामे होईल.’’

Web Title: Satara Marathwadi Dam Emptied

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top