esakal | साताऱ्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे प्रयत्न सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे प्रयत्न सुरु

सातारा शहरापासून पुणे- बंगळूर महामार्ग जात आहे. इतर सर्व प्रकारच्या सोयी- सुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी छोटे- मोठे उद्योगधंदे उभारण्यास मोठा वाव आहे असल्याचे आमदार भाेसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

साताऱ्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे प्रयत्न सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना महामारीला आळा घालत राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. उद्योग विभागामार्फत मॅग्नेटिक महाराष्ट्र भाग दोन या योजनेचा प्रारंभ केला आहे. रोजगार निर्मितीसाठी या योजनेत सातारा औद्योगिक वसाहतीतील देगाव, निगडी या नवीन एमआयडीसींचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
 
यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे.
 
निवेदनात शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले, की राज्य सरकारमार्फत मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या योजनेचा नुकताच प्रारंभ केला आहे. सातारा शहरालगत देगाव, निगडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर असून, जमिनीवर तसे शिक्के मारले आहेत. या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याची पडीक आणि माळरान नापीक जमीन विविध उद्योगांसाठी उपलब्ध होईल, तसेच योग्य मोबदला मिळाला, तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. त्यामुळे या नवीन एमआयडीसीचा समावेश मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये करावा. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी.
 
सातारा शहरापासून पुणे- बंगळूर महामार्ग जात आहे. इतर सर्व प्रकारच्या सोयी- सुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी छोटे- मोठे उद्योगधंदे उभारण्यास मोठा वाव आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, कामगारांविना बंद पडलेल्या कंपन्या पूर्ववत सुरू होण्यासाठी आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या उद्योगधंद्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी सातारा येथील देगाव, निगडी एमआयडीसी अनुकूल आहे. त्यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र या योजनेत सातारा एमआयडीसीचा समावेश करावा. 


मंत्री महाेदयांचे साताऱ्यात आवाहन; उद्योजकांनी परतलेल्या मुंबई, पुणेकरांना रोजगार द्या

निवडणुका पुढे गेल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रशासक आणायचे कोठून?