सायगावसह मोरघर कोरोनामुक्तीकडे

jawali
jawali

सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात निझरेपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रवास थांबल्यानंतर पुन्हा या तालुक्‍यात कोरोनाने तालुक्‍याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या गावांमधून पुन्हा शिरकाव केला. वरोशी, केळघरपर्यंत गेलेला कोरोना अचानक सायगाव भागात शिरल्याने प्रशासनासह सायगाव, मोरघर गावांतील ग्रामस्थांसह परिसरातील गावांचे धाबे दणाणले होते. महसूलसह आरोग्य विभागाने वेळीच साखळी तोडण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यात यश मिळत आहे. 

मुंबई-कोपरखैरणे येथून 16 मे रोजी सायगाव व मोरघर येथे एकाच कारमधून प्रवास करून आलेल्या 58 वर्षीय महिला सर्वांत प्रथम कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने सायगावमध्ये शांतता पसरली. संपर्कात आलेल्या सायगावमधील दोन महिला, एक युवक व तीन वर्षीय लहान मुलासह मोरघर येथील सासू-सून आणि त्यांची नात यांचे स्वॅब पाठविले. त्यात सायगावमधील एक, तर मोरघरमधील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील सायगाव येथील तीन युवक तसेच एक महिलेचे रिपोर्टदेखील निगेटिव्ह आल्याने आता सायगावसह परिसरातील जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला असून आरोग्य, पोलिस, महसूल प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने कोरोनाची साखळी वाढली नाही. मुंबई, पुण्यातून येणाऱ्या लोकांना सायगाव ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवल्याने ग्रामस्थ सुरक्षित राहिले आहेत. 

कोरोना साखळी रोखण्यासाठी तहसीलदार शरद पाटील यांनी सायगाव, मोरघर ही गावे पूर्णतः सीलबंद करण्याचे आदेश दिले असून गावातील प्रशासनाने ठरवून दिलेल्या अत्यावश्‍यक घरपोच सेवा फक्त चालू ठेवल्या असून बॅंकादेखील 14 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने गावात शुकशुकाट झाला असून सर्व रस्ते, बाजारपेठा निर्मनुष्य झाल्या आहेत. कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थदेखील बाहेर येत नसल्याने सायगाव, मोरघरकरांनी दक्षता घेतल्याने या गावातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. 
कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सायगाव, मोरघरमध्ये आशा व अंगणवाडी सेविकांच्या सात टीम तयार करून बाहेरून येणारे तसेच किरकोळ आजारी व्यक्तींची माहिती घेण्याचे काम करण्यास सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com