
NCP News : लबाडांना पवारांचे योगदान काय कळणार ; प्रभाकर देशमुख
दहिवडी : लबाडी व फसवणुकीवर ज्यांची राजकीय कारकीर्द उभी आहे. स्वार्थासाठी जे काहीही करायला तयार असतात. ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बाष्कळ बडबड करत खासदार शरद पवारांवर टीका करत आहेत.
त्यांना पवारांचे योगदान काय कळणार? असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.
भिलार येथे भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आमदार गोरे यांनी खासदार शरद पवारांवर टीका केली. त्याबाबत श्री. देशमुख म्हणाले, ‘‘नेहमीप्रमाणे आमदार गोरे हे खासदार शरद पवार यांच्यावर घसरले.
ज्या व्यक्तीने यशवंतनीतीने चालताना देशात आपल्या कर्तृत्वाने योगदान दिले. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भान बाळगणे गरजेचे आहे.
ज्या उरमोडीच्या पाण्यात हे नेहमी अंघोळीचा कार्यक्रम करतात. ते पाणी माण-खटावमध्ये खासदार पवार यांच्या प्रयत्नामुळे आले आहे. हे त्यांनी विसरू नये.
उरमोडी धरण पूर्ण झाल्यानंतर तीन-चार वर्षे ते पाणी धरणात तसेच पडून होते. उरमोडी जोड कालव्यातून कण्हेर कालव्यामध्ये पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता.
मी विभागीय आयुक्त असताना जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांना सोबत घेऊन खासदार पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खासदार पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बोलावून उरमोडी जोड कालव्याच्या कामास संमती देण्यास सांगितले.
शिवेंद्रसिंहराजे यांनी ती संमती मिळवून दिल्यानंतर फक्त दोन महिन्यांत जलसंपदा विभागाने तो कालवा पूर्ण केला. त्यानंतर उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आले, ही वस्तुस्थिती आहे.’’
खासदार पवार यांनी पुढाकार घेऊन तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून टेंभूचे अडीच टीएमसी पाणी माण-खटावच्या ४८ गावांसाठी आरक्षित केले. योजनेच्या सर्व्हेचे आदेश दिले, असेही त्यांनी सांगितले.
योगदानाबद्दल कृतज्ञता बाळगा
कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी एकात्मिक पाणलोट कार्यक्रमासाठी माण-खटावला १७५ कोटी रुपयांचा निधी दिला. पाणी फाउंडेशनच्या कामासाठी दहा कोटींपेक्षा जास्त रकमेची मदत केली.
त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना देश, राज्य, जिल्हा राहू द्या. किमान माण-खटावसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता बाळगा व माहिती घेऊन बोला, असा सल्ला देशमुख यांनी आमदार गोरे यांना दिला.