मुंबईकर युवकांची वृक्षारोपणासाठी धडपड, "लॉकडाउन'मध्ये केले सात हजार बियांचे रोपण

Satara
Satara

केळघर (जि. सातारा) : कोरोना विषाणूची महामारी व लॉकडाउनमुळे उद्योगधंदे विस्कळीत होऊन अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक मुंबईकर चाकरमानी गावाकडे आलेले आहेत. आपण ज्या गावात जन्मलो, वाढलो त्या गावचे आपण निश्‍चितच देणे लागतो या उदात्त हेतूतून लॉकडाउनमधील वेळेचा सदुपयोग करत जवळवाडी (ता. जावळी) येथील दोन युवकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावाजवळील डोंगरावर जवळपास 70 हून अधिक फळझाडे स्वतः खड्डे काढून लावली असून, या दोघांनी अंदाजे सहा ते सात हजारांहून अधिक बियांचे रोपण केले आहे. 

नवी मुंबईवरून संदीप मोरे व विनायक जवळ हे दोन युवक 15 मार्च रोजी जवळवाडीला आले होते. गावामध्ये आल्यावर त्यांची नजर जवळवाडीच्या डोंगरावर गेली. या डोंगरावर वृक्षारोपण करता येईल का याबाबत या दोघांनी चर्चा केली. दरम्यान यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहताना त्यांना "वनपुरुष' जाधव पाईंग (ओडीसा) यांच्या कामातून प्रेरणा मिळाली. हा विचार घेऊन वृक्षारोपण व जलसंधारण करण्याचा निर्धार या दोघांनी केला. याची सुरुवात गावाच्या डोंगरालगत पूर्वेस असणाऱ्या फार्मसी कॉलेजसमोरील टेकडीवरील पाणी चेंबरच्या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे वणवा न लागलेल्या ठिकाणापासून झाली. त्यानंतर तेथे डोंगरटेकडीच्या सुरवातीला 50000 हजार लिटर साठा होईल असा मोठा शोषखड्डा या दोघांनी श्रमदानातून काढला आणि नंतर या वाया जाणाऱ्या पाण्यालगत 185 वृक्षारोपणासाठी खड्डे काढले. या व्यतिरिक्त पाच लांब शोषखड्डे तयार केले.

यादरम्यान वाढत्या लॉकडाउनच्या काळामुळे बीज वृक्षारोपणाची संकल्पना या युवकांना सुचली आणि बिया शोधण्याचा प्रवास सुरू झाला. मग गावातील हिरवे आजींकडून करंजाच्या झाडाच्या 20 किलो बिया म्हणजे किमान 3500 ते 4000 बिया घेऊन या दोघांनी रोज सकाळी दोन व सायंकाळी तीन तास या वेळेच्या नियोजनाप्रमाणे गावालगतच्या डोंगराला चर काढून बीजारोपण सुरू केले. यादरम्यानच्या काळात ज्या बिया लावलेल्या होत्या, त्या सर्व उत्तम प्रकारे उगवल्या आहेत.

रोज नित्यनियमाप्रमाणे काम करून जेव्हा बियांची कमतरता भासू लागली तेव्हा मग गावातील सागवान व चिंच या व्यतिरिक्त इतर झाडांच्या भेटतील त्या सर्व बिया अधिक मिळालेल्या लॉकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करत लावणे सुरू ठेवले. विशेष म्हणजे या सर्व बिया शोधून आणण्यासाठी गावावरील डोंगरावरच्या पदुमलेमुरे गावाच्या परिसरातील जांभूळ बिया आणण्यासाठी गावातील मित्रांची मदत झाल्याचे या युवकांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने या सर्व कालखंडात साधारण पाच ते सहा हजार बियांची लागवड पूर्ण झाली आहे. आताही आंबा, फणस आणि करंजाच्या झाडांच्या बियांची लागवड सुरू आहे. 

पडिक डोंगरावर रोपण करण्याचे  नियोजन


बिया जमा करा किंवा तुम्ही स्वतः लावा... 
अजूनही पडिक डोंगरावर बियांचे रोपण करण्याचे आमचे नियोजन आहे. गाव आणि परिसरामध्ये कोणाकडे कोणत्याही झाडांच्या बिया असतील तर त्या आमच्याकडे जमा कराव्यात, त्या आम्ही लावू किंवा आपण स्वतः त्या बिया लावाव्यात, ही विनंती. बिया जमा करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी सपर्क साधावा, असे आवाहनही या युवकांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com