महाबळेश्वरात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम सुरू

अभिजित खुरासणे 
Thursday, 17 September 2020

आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्या वतीने प्रत्येक वॉर्डात पथकाची नेमणूक केली असून, त्यामध्ये प्रशिक्षित पालिका कर्मचारी, स्वयंसेवक व नर्सिंग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक नागरिकांचे तापमान व त्यांच्या ऑक्‍सिजन लेवलची तपासणी करणार आहेत.

महाबळेश्वर (जि. सातारा) : कोविड-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी येथील पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत बाजारपेठेतील व्यापारी कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी पाटील यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय जाहीर केला असून, या मोहिमेची माहिती देताना मुख्याधिकारी पाटील म्हणाल्या, "मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांमधील कोविडची लक्षणे शोधून त्यांना तातडीने उपचार मिळवून देणे, कोविड रुग्णांनी नंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांचे आरोग्य प्रबोधन करणे अपेक्षित आहे. यासाठी दोन टप्प्यात ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा आज सुरू झाला असून, दुसरा टप्पा 14 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून सदर माहिती राज्य शासनाने दिलेल्या ऍपमध्ये नोंद करण्यात येणार आहे.'' 

आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्या वतीने प्रत्येक वॉर्डात पथकाची नेमणूक केली असून, त्यामध्ये प्रशिक्षित पालिका कर्मचारी, स्वयंसेवक व नर्सिंग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक नागरिकांचे तापमान व त्यांच्या ऑक्‍सिजन लेवलची तपासणी करणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे. आपल्या घरी आलेल्या पथकाला सर्व माहिती द्यावी. काहीही माहिती लपवू नये. या मोहिमेची कोणतीही भीती बाळगू नये. 

ही मोहीम आपल्यासाठीच असून आपण व आपले कुटुंबाची जबाबदारी आपली आहे. याबाबत नागरिकांचे आरोग्य प्रशिक्षण घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कोविडची बाधा होऊ नये तसेच कोविड रुग्णांनी व कोविडमुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोविड बाधा होऊ नये यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यायची, याची सर्व माहितीही पथकाकडून नागरिकांपर्यंत पोचविली जाणार आहे. यासाठी पालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही मुख्याधिकारी पाटील यांनी दिली. 

""महाबळेश्वर लवकरच कोरोनामुक्त करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे.'' 

-स्वप्नाली शिंदे, नगराध्यक्षा, महाबळेश्‍वर पालिका 

संपादन : पांडुरंग बर्गे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara My Family My Responsibility Campaign Launched In Mahabaleshwar