
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना भेटल्यावरुन दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर सडकून टीका केली आहे. दलाल आणि गुत्तेदारांच्या कोंडावळ्यात वावरताना राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवेंद्रसिंहराजे... पक्षांच्या नेत्यांपुढे गोंडा घोळणे बंद करा
सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर सातारा व जावळीचे आमदार त्यांच्यापुढे गोंडा घोळत सातारा व कऱ्हाड शासकीय विश्रामगृहात येतात. त्यांनी ही बिन बुलाये मेहमानबाजी यापुढे कायम करावी; पण ते करताना मतदारसंघात दलाल आणि गुत्तेदारांच्या कोंडावळ्यात वावरताना राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे जावळीचे नेते दीपक पवार यांनी दिला आहे.
यासंदर्भात श्री. पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की सातारा- जावळीच्या विद्यमान आमदारांच्या घरात राजकीय निष्ठांची मोठी टंचाई आहे. ते ज्या पक्षात असतात. त्या पक्षाशी ते कधीही प्रामाणिक राहात नाहीत. जनता पक्षात असताना इंदिरा कॉंग्रेसमध्ये त्यांची ऊठबस होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना कॉंग्रेस आणि भाजपबरोबर त्यांची ऊठबस होती. काहीही कारण नसताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडला; पण तो पक्ष सोडताना पक्षाच्या पॅनेलमधून ते जिल्हा बॅंकेत निवडून आले. त्याच पक्षाच्या बहुमतावर बॅंकेचे अध्यक्ष झाले. त्याच पदावर ते गुळाला मुंगळा चिकटल्यासारखे चिटकून आहेत.
पूर्वी विकासकामांच्या नावाखाली भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या मागेपुढे पळत होते. आताही विकासकामांच्या नावाखाली आमच्या नेत्यांच्या पुढे गोंडा घोळत आहेत. सातारा शहरातील रस्त्यासाठी 50 कोटी व साताऱ्याची हद्दवाढ झालीच असे सांगणारे हे आमदार एक वर्षे उलटल्यानंतर लबाड ठरले आहेत. विरोधी पक्षातून निवडून आल्यावर किमान राजकीय नैतिकता संभाळली जाते, ती त्यांनी संभाळायला हवी; पण साताऱ्याच्या आमदारांना आमच्या पक्षाचे कोणीही मान्यवर बोलवत नसताना ते खासगी व संस्थात्मक दौऱ्यावर आल्यावर शासकीय विश्रामगृह, हॉटेल येथे येऊन लाचार शिष्टता नावाची नवीन परंपरा निर्माण करत आहेत. त्या पक्षाशी तो द्रोह आहे. सातारा-जावळी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे या आमदाराची स्थानिक राजकारणातील लुडबूड आम्ही सहन करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था त्यांनी पूर्वी वाटण्यासाठी केल्या होत्या. त्या आता वेण्णा धरणात बुडाल्या आहेत. त्यांना आमच्या नेत्यांबद्दल प्रेम असेल; पण त्यांनी जावळी तालुक्यात लुडबूड करू नये. प्रेम खोटे असेल तर त्यांनी पक्षाच्या बॅनरखाली फिरावे अन्यथा पक्षाच्या चिन्हावर जावळी तालुक्यात यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी आमदारांना दिले आहे.
गाडीत तीन टोप्या ठेवा...
गाडीत त्यांनी महाआघाडीच्या तीन प्रमुख पक्षांच्या टोप्या ठेवाव्यात. ज्या पक्षांचा मंत्री, त्या पक्षाची टोपी घालून फोटो काढावेत. सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला उभे राहिल्याशिवाय अंग भिजत नाही, अशी त्यांची गत झाली आहे, असा टोलाही श्री. पवार यांनी लगावला आहे.
(संपादन ः संजय शिंदे)
गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात आयसीयू बेड वाढणार, काेणत्या तालुक्यात वाचा
Web Title: Satara Ncp Leader Dipak Pawar Criticzes Bjp Mla Shivendrasinghraje Bhosale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..