
Satara News: नीरा- देवघर पाटबंधारे प्रकल्पास मान्यता
फलटण शहर : नीरा- देवघर पाटबंधारे प्रकल्पास राज्य शासनाने ३९७६.८३ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय करून तसा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली.
नीरा- देवघर प्रकल्पाचे लाभ क्षेत्र कृष्णा खोऱ्यामध्ये आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये आहे. नीरा- देव
घर प्रकल्पाच्या कालव्यांमुळे भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ११,८६० हेक्टर, फलटण तालुक्यातील १३,५५० हेक्टर व माळशिरस तालुक्यातील १०,९७९ असे एकूण ४०,०५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
याशिवाय सांगोला व पंढरपूर तालुक्यांतील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारकडून हा प्रकल्प होऊ नये, यासाठी खूप प्रयत्न केले गेले. आजपर्यंत अनेक तालुक्यांतील दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप त्यांनी केले होते;
परंतु राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा करून नीरा-देवघर प्रकल्पाची बंद पडलेली फाइल सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढे नेली. या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प होणे खूप गरजेचे आहे.
यासाठी राज्यस्तरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबत त्यांच्या दालनामध्ये सचिव व अधिकारी यांची बैठक घेऊन यास मंजुरी घेतली.
याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. आता लवकरच निविदा निघणार असून, काम सुरू होईल, असा विश्वास खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.