साताऱ्यातील विस्तारित भागांसाठी 100 कोटी?; अर्थसंकल्पात 22 कोटींची तरतूद

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : हद्दवाढीमुळे सातारा नगरपालिकेत आलेल्या शाहूपुरी, विलासपूरसह उपनगरांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार तेथील विकासकामांसाठी 100 कोटींची आवश्‍यकता असून, तो निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव नगरपालिकेकडून नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेने या भागासाठी सुमारे 22 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. 

हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी, विलासपूर या दोन ग्रामपंचायती तर दरे खुर्द, शाहूनगर, पिरवाडी व इतर उपनगरांचा सातारा पालिका हद्दीत समावेश झाला आहे. त्यानंतर शाहूपुरी, विलासपूर या दोन स्वतंत्र मुलकी ग्रामपंचायती बरखास्त झाल्या. या दोन्ही ग्रामपंचायतींचे स्वतंत्र वार्षिक उत्पन्न सुमारे दहा कोटींच्या घरात, तर त्या ठिकाणच्या विकासकामांसाठी विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुमारे 30 कोटींच्या आसपास निधी मिळत होता. पालिकेत आलेल्या या भागातील विकासकामांना गती मिळावी, अशी मागणी त्याठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी वारंवार पालिकेकडे केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात विस्तारित भागातील विकासकामांसाठी 22 कोटींची तरतूद करण्यात आली. 

विस्तारित भागांच्या तुलनेत तरतूद केलेला निधी कमी पडणार असल्याने त्याठिकाणचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले होते. या विकास आराखड्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या आराखड्यात विस्तारित भागात बागा, उद्याने, रस्ते, आरोग्य, सार्वजनिक विद्युत सेवा, सभागृहे, समाजमंदिरे, विरंगुळा केंद्रे, तसेच त्याठिकाणी प्रशासकीय यंत्रणा उभारणी, कचरा संकलन व इतर नागरी सुविधा उभारण्यासाठीचे पर्याय, प्रस्ताव सुचविण्यात आले आहेत. 

या आराखड्यातील कामे प्रत्यक्षात उतरण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. त्यानुसार निधी मागणी करणारा प्रस्ताव येत्या काही दिवसांत पालिका राज्य शासनास सादर करणार आहे. सातारा पालिकेस 100 कोटींचा निधी मिळाल्यास त्याठिकाणच्या विकासकामांना वेग येणार आहे. 
सातारा शहराबरोबरच सातारा विकास आघाडीने पालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून विस्तारित भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी विकासकामांची पेरणी करत सातारा विकास आघाडीच्या पदधिकाऱ्यांनी राजकीय मोर्चेबांधणीवर जोर दिला आहे. या मोर्चेबांधणीचाच एक भाग म्हणून या भागात जास्तीतजास्त विकासकामे करत नागरिकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सातारा विकास आघाडीकडून सुरू आहेत. 

विस्तारित भागातील प्रलंबित कामांबरोबरच नव्याने त्याठिकाणी कोणती कामे करायची, याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. हा आराखडा तयार केला असून, त्यानुसार करायच्या कामांसाठी 100 कोटींची आवश्‍यकता आहे. या निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. 

-माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com