कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गाला खड्ड्यांचे ग्रहण; कोयनेतील जनतेचा आंदोलनाचा इशारा

विजय लाड
Wednesday, 13 January 2021

कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर राममळा गावाजवळ खड्डे चुकवताना कोयना जलविद्युत प्रकल्पातील राहुल काटवटे यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले.

कोयनानगर (जि. सातारा) : खड्डेमय रस्त्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पातील कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला असून, त्याच्या मृत्यूला जबाबदार धरून रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कोयना विभागातील जनतेने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर राममळा गावाजवळ खड्डे चुकवताना कोयना जलविद्युत प्रकल्पातील राहुल काटवटे यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले. त्यानंतर संतप्त प्रवासी नातेवाईक व कोयना विभागातील जनतेने अपघातास रस्ते प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा घेऊन राज्यमार्ग रोखून एक तास रास्ता रोको केला होता. या पार्श्वभूमीवर कोयना पोलिस ठाणे येथे कोयना विभागातील जनता, रस्ते प्राधिकरणाच्या सहायक अभियंता श्रुती नाईक, एल अँड टी कंपनीचे अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव, बापू देवळेकर, शैलेंद्र शेलार, रामभाऊ मोरे, दयानंद नलवडे, नंदकुमार सुर्वे, बाळासाहेब कदम, सचिन कदम, भरत कुराडे, जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. 

मायणीत सर्रास दुरंगी लढती; कलेढोणमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीत कॉंटे की टक्कर

यावेळी श्रुती नाईक म्हणाल्या, "संगमनगर (धक्का) ते घाटमाथा या 10.4 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निविदा प्रक्रियेत आहे. ते मंजूर होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तरी कोयना विभागातील जनतेच्या भावनेचा उद्रेक होऊ नये म्हणून 17 जानेवारीला काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी 5.73 कोटी निधी मिळणार आहे. तांत्रिक मंजुरी घेऊन काम सुरू करण्यात येईल.'' चंद्रकांत माळी यांनी पोलिस प्रशासनाने रस्ते प्राधिकरणाला काम लवकर सुरू करण्याबाबत नोटीस दिल्याचे सांगितले, अन्यथा कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

कृषीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मोदी सरकारला पळवाट : माजी मुख्यमंत्र्यांची टीका  

कोयना पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद 

दरम्यान, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी राहुल काटवटे यांचा मृत्यू राममळा येथे आकस्मात झाल्याची नोंद कोयना पोलिसांत झाली आहे. या मृत्यूला कोण दोषी आहे, हे अधिक तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Citizens Of Koynanagar Warn The Administration Of Agitation