गावठाण हस्तांतरणाची एवढी घाई का?; घोटीलच्या धरणग्रस्तांचा अधिकाऱ्यांना जाब

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

ढेबेवाडी (जि. सातारा) : पुनर्वसित ठिकाणी शेतजमिनीचे विविध प्रश्न लोंबकळत ठेवत गावठाण हस्तांतरणाचा घाट कशाला घालताय? अगोदर जमिनीचा गुंता सोडवा आणि मगच गावठाणातील नागरी सुविधांचे पाटबंधारे विभागाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करा, असे ताईगडेवाडी (ता. पाटण) येथील गावठाणात पुनर्वसित झालेल्या मराठवाडी धरणांतर्गत घोटीलच्या धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. 

ताईगडेवाडी पुनर्वसित गावठाणचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारेच्या सहायक अभियंता (श्रेणी एक) रोहिणी चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रियांका वाघमोडे, सहायक गटविकास अधिकारी विजय विभूते, विस्तार अधिकारी श्री. डुमणे, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता जयदीप गव्हाणे, बांधकामचे शाखा अभियंता मधुकर कांबळे आदी अधिकाऱ्यांनी गावठाणाची पाहणी करून रहिवाशांसी चर्चा केली. मूळ मालक जमिनी कसू देत नाहीत. न्यायालयाने काही जमिनी संपादनातून वगळल्या आहेत. खडकाळ- मुरमाड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. अंशतः जमीन वाटप झालेल्यांना उर्वरित जमिनीची प्रतीक्षा कायम आहे. जमिनी ऐवजी रोख रकमेची मागणी धूळ खात पडली आहे. 

लाभक्षेत्रातून वगळलेल्या चार गावांत पूर्वी वाटप केलेल्या जमिनीचा प्रश्न अधांतरी आहे, अशा एक ना अनेक तक्रारी यावेळी धरणग्रस्तांनी मांडत सर्व मागण्यांचा निपटारा होईपर्यंत गावठाणचे हस्तांतरण करू नये, अशी मागणी केली. सुनील पवार, भरत पवार, सुरेश पवार, अंकुश पवार, गणपत पवार, धनाजी पवार, उमेश पवार, उत्तम पवार, कुंडलिक माने, विठ्ठल माने, प्रशांत पाटील, निवास पवार आदींसह धरणग्रस्त महिला-पुरुष उपस्थित होते. तुटलेली व मुजलेली अंतर्गत गटारे, रस्त्यावरील वीज वाहिन्या, पाइपलाइन गळती, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आदींच्या अनुषंगानेही धरणग्रस्तांनी प्रश्न उपस्थित केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com