निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार?

निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार?

कास (जि. सातारा) : पाटणसारखीच निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार या चर्चा सोशल मीडियातून चर्चिल्या जात आहेत. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालुक्‍यात पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
 
जावळी तालुका हा निसर्ग संपदने नटलेला तालुका. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तालुक्‍यात जागतिक वारसास्थळ असलेले कास पठार, कोयना जलाशयावर तयार झालेला अथांग शिवसागर जलाशय, बामणोलीतील बोटिंग, ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा अद्‌भुत ट्रेक, एकीवचा धबधबा, बोंडारवाडीचा वॉटर फॉल, रेंगडीचा बगदाद पॉइंट, तेथून सह्याद्रीच्या माथ्यावरून सह्याद्रीनगर, कास पठाराकडे येणारा ऐतिहासिक राजमार्ग, या राजमार्गावर असलेले गाळदेव व मोळेश्वर गावांतील प्राचीन शिवमंदिर, कोयना व वेण्णा नद्यांचे बॅकवाटरचा विहंगम नजारा, सह्याद्रीनगरचा सनसेट पॉइंट, शेंबडीचा नारायण महाराजांचा मठ, भुटेश्वर मंदिर, वडाचे म्हसवे गावातील आशिया खंडातील सर्वात मोठा वडाचा वृक्ष, कास तलाव, अंधारीचा धबधबा, मेरुलिंग, कुसुंबीचे देवस्थान काळेश्वरीदेवी, बोलाई मंदिर, मेढा- मोहाट पूल, निझरे-धनकवडीचा सुदंर निसर्ग, केडंबे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे गाव व तेथील नियोजित स्मारक असा पर्यटनासाठीचा खजिना... असे निसर्गसौंदर्य जावळी तालुक्‍यात आहे. 

कास, बामणोली, वासोटा अशी ठराविक ठिकाणे सोडली तर इतर ठिकाणी पर्यटन होत नाही. जावळी तालुक्‍यातील बहुतांश तरुण रोजगार उपलब्ध नसल्याने मुंबईची वाट धरतात. तालुक्‍यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. डोंगरदऱ्यामुळे बागायती शेती फार कमी. त्यात तालुक्‍यात एकही कंपनी नाही. प्रतापगडसारखा एकमेव साखर कारखाना, तोही बंद. त्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी नाहीत. पर्यटन वाढीतून तालुक्‍याचा विकास नक्कीच होऊ शकतो. नियोजित नवीन महाबळेश्वर प्रकल्पात ही बामणोली भागातील काही गावे आहेत. त्यामध्ये राजमार्गावरील गावांचा समावेश करून या प्रकल्पाला गती दिल्यास तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाचा चेहरामोहरा बदलू शकतो. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठीही आराखडा होणे गरजेचे असून, त्यामध्ये तालुक्‍यातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

जावळी तालुक्‍यातील वातावरण औषधी वनस्पती उत्पादन करण्यास पूरक आहे. त्या दृष्टीने विचार न करता पारंपरिक शेती करण्यात शेतकरी धन्यता मानत आहेत. प्रयत्न केले तर जावळी तालुक्‍यातील सर्व पर्यटनस्थळ विकसित होतील. 
-जयश्री शेलार, सामाजिक कार्यकर्त्या 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com