गुटखा विक्री बंद करा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडात गुटखा भरु; प्रशासनाला मनसे स्टाईल इशारा

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

सातारा : गुटखा बंदी असताना चौकाचौकांत सर्रास गुटखा विक्री होत आहे. प्रशासन फक्त कागदावर कारवाई करत असल्याने आज जागतिक कर्करोगदिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात धडक दिली. गुटखा विक्री कशी होते, त्याची पुराव्यासाहित माहिती अधिकाऱ्यांना दिली. येत्या 24 तासांत सातारा शहरात गुटखा बंदी करा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडात गुटखा भरण्याचा इशारा देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज सातारा शहरातील राजरोस सुरू असलेल्या गुटखा विक्रीवरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. श्री. पवार म्हणाले, "अन्न व औषध कार्यालयाच्या बाहेरच्या टपरीवर गुटखाविक्री होत असून, कार्यालयाच्या भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासनची गाडी बाहेर धूळखात उभी असेल, या सारखी दुसरी शरमेची गोष्ट नाही.'' 

येत्या 24 तासांच्या आत सातारा शहरात गुटखाबंदी झाली नाही, तर अधिकाऱ्यांच्या तोंडात गुटखा भरला जाईल. त्यानंतर जो कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल. त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे. या वेळी शहर उपाध्यक्ष रवी मुश्‍ताक बोहरी, भरत रावळ, वैभव वेळापुरे, विभाग अध्यक्ष गणेश पवार, अविनाश भोसले, अझहर शेख, राज पुजारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com