साताऱ्यात मागेल त्याला पाणी कनेक्‍शन द्या; उदयनराजेंच्या प्राधिकरणाला सक्त सूचना

साताऱ्यात मागेल त्याला पाणी कनेक्‍शन द्या; उदयनराजेंच्या प्राधिकरणाला सक्त सूचना

सातारा : शाहूपुरी भागाला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठीच्या कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा आढावा नुकताच खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला. आढावा घेतल्यानंतर वाढीव लोकवस्तीचा विचार करत नवीन योजनेतून मागेल त्याला कनेक्‍शन देण्याच्या सूचना उदयनराजेंनी प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे आणि पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिल्या. 

शाहूपुरी हद्दीतील लोकवस्तीच्या अखंडित पाणीपुरवठ्यासाठीच्या कण्हेर धरण पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम अंतिम टप्प्यात असतानाच हद्दवाढीमुळे शाहूपुरी ग्रामंचायतीचा सातारा नगरपालिकेत समावेश झाला. याच काळात योजनेसाठीचा वाढीव निधी खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नातून आणि माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्या पाठपुराव्यातून प्राधिकरणाकडे शासनाने वर्ग झाला. उदयनराजेंनी या पाणी योजनेचा नुकताच आढावा घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे, मुख्याधिकारी अभिजित बापट, संजय पाटील, अमित कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

सध्या चार हजार 500 इतके ग्राहक असून, त्यांना नवीन योजनेतून प्राधान्याने नळ कनेक्‍शन देण्यात येणार असल्याची माहिती मोटे यांनी बैठकीत दिली. संजय पाटील यांनी जुने चार हजार पाचशे आणि वाढीव लोकसंख्येचा विचार करता नव्याने पाच हजार नळ कनेक्‍शन द्यावी लागतील, असा मुद्दा उपस्थित केला. मुद्दा ऐकून घेतल्यानंतर उदयनराजेंनी जुन्या ग्राहकांना प्राधान्याने कनेक्‍शन देतानाच नव्याने मागणी करणाऱ्यांनाही नियमानुसार कनेक्‍शन देण्याच्या सूचना दिल्या. 

पालिकेने घेतला कामाचा आढावा 

प्राधिकरणाच्या माध्यमातून शाहूपुरी, तसेच शहरालगतच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. हद्दवाढीमुळे हा परिसर पालिकेत आला असून, त्याठिकाणचा पाणीपुरवठा यापुढील काळात पालिकेच्या माध्यमातूनच करावा लागण्याची चिन्हे आहेत. यामुळे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शाहूपुरीतील ग्राहक, त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम याची माहिती प्राधिकरणाकडून मागवली होती. यानुसार ती माहिती पालिकेस देण्यात आली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com