esakal | बहिणीला बनवले मानलेल्या भावानेच 'मामा'; उस्मानाबादी शेळ्या घेऊन पसार
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणीला बनवले मानलेल्या भावानेच 'मामा'; उस्मानाबादी शेळ्या घेऊन पसार

"ताई ताई' म्हणत मानलेल्या बहिणीच्या बाळाचे आठ दिवसांपूर्वीच जावळ काढलेल्या तथाकथित "मामा'ने त्याच्या साथीदाराच्या मदतीने बहिणीच्याच दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी ल्हासुर्णे फाटा (ता. कोरेगाव) येथे उघडकीस आली.

बहिणीला बनवले मानलेल्या भावानेच 'मामा'; उस्मानाबादी शेळ्या घेऊन पसार

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : "ताई ताई' म्हणत मानलेल्या बहिणीच्या बाळाचे आठ दिवसांपूर्वीच जावळ काढलेल्या तथाकथित "मामा'ने त्याच्या साथीदाराच्या मदतीने बहिणीच्याच दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी ल्हासुर्णे फाटा (ता. कोरेगाव) येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे यासंदर्भात सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान फिर्याद दाखल झाल्यानंतर केवळ पाच तासांच्या आत पोलिसांनी मुख्य संशयिताच्या साथीदाराला पकडून दोन शेळ्या देखील परत मिळवल्या आहेत. आता या तथाकथित मामाचा शोध पोलिस घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सागर विष्णू बोडरे (रा. जुनी पेठ, कोरेगाव) यास अटक झाली आहे. मुख्य संशयित दीपक बाळासाहेब बोडरे (रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव) याचा शोध पोलिस घेत आहेत. यासंदर्भात बाळासाहेब बंडू पिसाळ (रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की ल्हासुर्णे फाटा येथील नितीन खंडागळे यांच्या नर्सरी शेजारील शेडमधून 17 हजारांच्या दोन मोठ्या उस्मानाबादी जातीच्या शेळ्या अज्ञाताने चोरून नेल्या आहेत. दरम्यान, फिर्याद दाखल होताच सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर व उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. 

केंद्र शासनाकडून जांबाज पोलिस अधीक्षकांचा विशेष पदकाने सन्मान; गडचिरोली, छत्तीसगडच्या कामगिरीची दखल

तपासादरम्यान मिळालेली माहिती व संशयितांच्या हालचालींवरून दीपक बोडरे व सागर बोडरे यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरून नेलेल्या दोन शेळ्यांपैकी एक शेळी भाकरवाडी येथील एका ओळखीच्या व्यक्तीच्या अंगणातील दावणीला बांधल्याचे व एक शेळी कोरेगाव येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मटण शॉपमध्ये विकली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हवालदार प्रमोद चव्हाण, पोलिस नाईक सनी आवटे, कॉन्स्टेबल अमोल कणसे, प्रमोद जाधव यांच्या पथकाने दोन्ही शेळ्या ताब्यात घेतल्या व गुन्ह्यातील एक संशयित सागर बोडरे यास अटक केली. हवालदार सुधीर खुडे तपास करत आहेत. 

पाटणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेला दुय्यम वागणूक; आर्थिक भुर्दंडाचा सोसावा लागतोय भार

चोरीनंतर संशयिताकडूनच सल्ला 

चोरीस गेलेल्या शेळ्यांच्या शोधासाठी कोरेगाव येथील जनावरांच्या बाजारात मी पत्नीसमवेत आलो असता तेथे संशयित दीपक भेटला. त्याला शेळ्या चोरीस गेल्याचे व त्याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात निघालो असल्याचे सांगितले. त्यावर दीपकने पोलिसांकडे न जाण्याचा सल्ला दिला होता, असेही बाळासाहेब पिसाळ यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image