esakal | जिल्ह्याच्या 485 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

आराखड्यात अनुसूचित जाती विकासासाठी 79 कोटी 83 लाख, तर आदिवासी क्षेत्रबाह्य उपाययोजनांसाठी 1 कोटी 58 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या 485 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत 2021-2022 च्या 485 कोटी 90 लाख रुपये निधीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मूळ प्रारूप निधीबरोबरच विकासकामांना गती मिळावी, यासाठी शासनाकडे 140 कोटींचा वाढीव निधी मागितल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हा नियोजन समितीची सभा तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. या सभेस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. या सभेत झालेल्या निर्णयांची माहिती पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री पाटील म्हणाले, ""नियोजन समितीच्या मूळ प्रारूप आराखड्यात 345 कोटी रुपयांची तरतूद होती. कोरोना कालावधीत विकासकामांवर मर्यादा पडल्याने शासनाकडे 140 कोटींचा वाढीव निधी मागण्यात येणार आहे. मूळ प्रारूप आणि वाढीव निधी अशा 485 कोटी 90 लाखांच्या निधीतून विविध कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्याचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा
 
आराखड्यात अनुसूचित जाती विकासासाठी 79 कोटी 83 लाख, तर आदिवासी क्षेत्रबाह्य उपाययोजनांसाठी 1 कोटी 58 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नगरोत्थान योजनेतून 10 कोटी 74 लाख खर्चाची 38 कामे, नागरी दलितेतर सुधार योजनेतून 1 कोटी 30 लाख खर्चाची 5 कामे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेतून 18 कोटी 54 लाख खर्चाच्या 53 कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.'' नगरोत्थान योजनेतून 54 कोटी 44 लाखांची 283 कामे, नागरी दलितेतर सुधार योजनेतून 16 कोटी 67 लाखांची 123 कामे, जिल्हा अग्निशमन यंत्रणेची 95 लाख 69 हजारांची चार कामे, गिरिस्थान पर्यटन योजनेतून 20 लाखांची दोन कामे, दलित वस्ती सुधारणा योजनेतून 25 कोटी 95 लाख खर्चाच्या 151 कामांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. याचबराबेर 12 कोटी 46 लाखांचे नवीन प्रस्तावही आराखड्यात सामील करून घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील भटक्‍या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी 50 लाखांच्या निधीची तरतूद केल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

आमचे खास बंधू.. म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर

कोरोना कालावधीत विकासकामांवर मर्यादा पडल्याने शासनाकडे 140 कोटींचा वाढीव निधी मागण्यात येणार आहे. मूळ प्रारूप आणि वाढीव निधी अशा 485 कोटी 90 लाखांच्या निधीतून विविध कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्याचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 
-बाळासाहेब पाटील, पालकमंत्री, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे