
मराठवाडी धरणग्रस्तांच्या डोक्यावरील वर्षानुवर्षांचे प्रश्न व अडीअडचणीचे गाठोडे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात बरेच हलके केले.
ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांच्या डोक्यावरील वर्षानुवर्षांचे प्रश्न व अडीअडचणीचे गाठोडे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात बरेच हलके केले. धरणग्रस्तांशी थेट संवाद साधत त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला, तर काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चर्चेचा मार्गही मोकळा करून दिला.
मराठवाडी धरणग्रस्तांशी थेट संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकताच धरणांतर्गत विविध गावांचा दौरा केला. त्यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, उत्तम दिघे, तहसीलदार दिप्ती रिटे, सहायक अभियंता रोहिणी चव्हाण, शरद पवार, नईम सुतार, संदीप सरगर, प्रियांका वाघमोडे, प्रकल्प अभियंता संदीप मोरे आदींसह भूमिअभिलेख, नगरविकास, पाटबंधारे, महसूल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विविध संघटनांचे प्रतिनिधी देवराज देशमुख, जगन्नाथ विभूते, जितेंद्र पाटील, सुनील मोहिते, अनिल शिंदे, प्रताप मोहिते, मनोज मोहिते, संदीप ढेब, अधिक सावंत आदींनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चर्चेवर मर्यादा आल्या; परंतु बऱ्याच समस्यांबाबत चांगली चर्चा झाली.
कृषीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मोदी सरकारला पळवाट : माजी मुख्यमंत्र्यांची टीका
मेंढ येथील नवीन गावठाणातील भूखंड वाटप, जिंती- सावंतवाडीतील धरणग्रस्तांची पाण्यात बुडालेली शेती व त्यांचे प्रश्न, जमीन वाटप प्रक्रिया, खडकाळ-मुरमाड, तसेच न्यायालयीन बाबीत अडकलेल्या जमिनीचा प्रश्न, मूळ शेतकऱ्यांकडून धरणग्रस्तांना जमीन कसण्यास होणारा विरोध, गावठाणातील नागरी सुविधांची कामे, जमिनीऐवजी रोख रक्कम मागणीचे प्रलंबित प्रस्ताव, घोटील-ताईगडेवाडीतील अडचणी आदींसह अन्य अनेक प्रश्नी सकारात्मक चर्चा झाली.
हजारमाचीत 18 महिला रिंगणात; लक्षवेधी लढतींकडे जिल्हावासियांच्या नजरा
मेंढ येथील जमीन वाटपासह काही प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी धरणग्रस्तांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत शंका निरसन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचे सकारात्मक पाऊल टाकल्याने धरणग्रस्तांनी समाधान व्यक्त केले असून, दिलेल्या आश्वासनानुसार बैठका व अन्य बाबींचा नियोजनबद्ध पाठपुरावा करण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे