कऱ्हाडात वाहन पार्किंगचा प्रश्‍न जटील; पालिकेकडून कार्यवाहीचा अभाव

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात चारचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येचा मेळ घालताना पार्किंगसाठी कसरत करावी लागत आहे. बाजारपेठेत उपलब्ध मोकळ्या जागा आणि वाहनांची संख्या यांचा मेळच बसेना अशी स्थिती आहे. पर्याय शोधताना पालिका व पोलिसांचीही दमछाक होत आहे. वाहनांची संख्या जास्त अन्‌ पार्किंगला जागा तोकड्या अशी स्थिती आहे. ज्या पार्किंगला जागा आहेत, त्या स्थानिकांच्या वाहनांनी बळकावल्या आहेत. त्यामुळे बाहेरून बाजारहाट अथवा खरेदीसाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोयच नाही. चारचाकी वाहनांचे एकही वाहनतळ नाही, पालिकेने त्यासाठी काहीही प्रस्तावित केलेले नाही. 

शहरासह उपनगरांत घरटी मोठे वाहन आहे. त्यामुळे त्यांच्या पार्किंगचा प्रश्न जटील होतो आहे. रात्री एखादी दुर्घटना झाली तर त्या वाहनांच्या गर्दीतून वाट शोधत मदत कार्य राबवावे लागते. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मोठी कठीण स्थिती होते, याचा पूर्वानुभव वारंवार आलेला आहे. शहरात घरे आहेत. मात्र, त्यांच्या वाहनांना पार्किंगच्या जागा नाहीत. पर्यायाने ते लोक पालिकेच्या जागेत म्हणजेच भर रस्त्यावर वाहने पार्क करतात. शुक्रवार, गुरुवार, रविवार, शनिवार पेठेसह रुक्‍मिणीनगर, कार्वे नाका परिसरातील कॉलन्या, कोल्हापूर नाका परिसरातील कॉलन्यांत रस्त्यावरच वाहने पार्क होतात. त्यातून मार्ग काढत दुसऱ्या वाहनाला जावे लागते. 

अनेक ठिकाणी तेही शक्‍य होत नसल्याने कसरत करावी लागते. त्यातून वादावादाची प्रसंग ठरलेलाच असतो. त्यामुळे चारचाकी वाहनांचा प्रश्न शहरात अत्यंत जटील झालेला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या कायमस्वरूपी पार्किंगसाठी काय करता येईल याचा विचार पालिका व पोलिसांना करावा लागणार आहे. दैनंदिन खरेदीसाठी चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बाजारपेठेत मोजक्‍या जागीच पार्किंगची सोय आहे. मात्र, तेथे आधी शहरातील व्यापाऱ्यांच्या कारचे पार्किंग झालेले असते. त्यामुळे नवीन वाहन आले, की ते त्याच दाटीवाटीत लावले जाते. त्यामुळे तासन्‌तास त्या ठिकाणी कोंडी होतेच. त्याशिवाय स्थानिक नागरिकांनाही ये- जा करण्यासाठी वाहनांची अडचण येते. त्यामुळे मोठ्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अवघड होत आहे.

पोलिसांच्या उपायाकडे पालिकेचे दुर्लक्ष 

पार्किंगबाबत पोलिसांनी पालिकेला उपाय सुचवला होता. त्यात मोकळ्या जागा आहेत. तेथे पालिकने चार चाकी वाहनांचे पार्किंग जाहीर करावे. तेथे "पे ऍण्ड पार्क'ची व्यवस्था करावी. त्याची जबाबदारी स्थानिक युवकांकडे द्यावी. त्यातून स्थानिक युवकाला रोजगार तर मिळेलच पालिकेलाही उत्पन्न मिळेल व वाहतूक कोंडीचा तिढाही सुटेल, त्यावर पालिकेने काहीही विचार केलेला नाही. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com