esakal | शंभू महादेवाची चैत्री यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द; शिंगणापुरात प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

यंदा ही यात्रा 17 ते 27 एप्रिलदरम्यान होती. मात्र, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.

शंभू महादेवाची चैत्री यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द; शिंगणापुरात प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

sakal_logo
By
धनंंजय कावडे

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या येथील श्री शंभू महादेवाची वार्षिक चैत्री यात्रा काल येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यात्रा नियोजन बैठकीमध्ये रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी माणच्या तहसीलदार बाई माने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती बंदुके, देवस्थान व्यवस्थापक ओंकार देशपांडे, राजाराम बोराटे, हरिभाऊ बडवे उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द झाल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. 

यंदा ही यात्रा 17 ते 27 एप्रिलदरम्यान होती. मात्र, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शंभू महादेवाची वार्षिक चैत्री यात्रा रद्द करण्यात आली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा गर्दी टाळण्यासाठी कडक निर्णय राबविणार असल्याचे प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी यावेळी जाहीर केले. यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणसह राज्यभरातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे प्रशासनाने यात्रेवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वार्षिक यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी जाहीर केले. यात्रेतील सर्व धार्मिक विधी स्थानिक सेवाधारी, मानकऱ्यांनी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात

यात्रा कालावधीत बाहेरून येणाऱ्या भाविकांना शिंगणापूरमध्ये येण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून, यात्रा काळात शिंगणापूर गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनास दिल्या आहेत. यात्रा कालावधीत शिंगणापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, भाविकांना रोखण्यासाठी शिंगणापूर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सांगितले. यात्रा कालावधीत ग्रामपंचायत, देवस्थान समितीने खबरदारी घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी दिल्या असून, भाविकांसह, व्यावसायिक, सेवाधारी, ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

प्रेमीयुगुलांनो! तुम्हाला लुटणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; सोलापूर, बारामतीतील सहा जणांना अटक

धार्मिक विधी आणि निर्बंध 

  • फक्त स्थानिक मानकरी, सेवेकऱ्यांनी यात्रा, उत्सव पार पाडावयाचा आहे.
     
  • 144 जमावबंदी असल्यामुळे गर्दी केल्यास गुन्हे दाखल करणार
     
  • शासन आदेशानुसार सर्वांनी आरोग्यासाठीचे कोरोना नियम न पाळल्यास कारवाई होणार  

साता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top