esakal | ऐंशी वर्षाच्या योद्ध्यावर वरुणराजाचा जलाभिषेक; ऐतिहासिक सभेची सातारकरांना आजही आठवण!
sakal

बोलून बातमी शोधा

ऐंशी वर्षाच्या योद्ध्यावर वरुणराजाचा जलाभिषेक; ऐतिहासिक सभेची सातारकरांना आजही आठवण!

मंत्रीपद मिळेल, या आशेने सातारा जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोण वाचविणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या 80 वर्षाच्या योद्याने संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढला. 'अजून मी म्हातारा झालेलो नाही', असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली.

ऐंशी वर्षाच्या योद्ध्यावर वरुणराजाचा जलाभिषेक; ऐतिहासिक सभेची सातारकरांना आजही आठवण!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणूक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा पार पडली. ही सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धो.. पाऊस असूनही यशस्वी केली. धो.. पावसात भिजत शरद पवार यांनी सातारकरांना साद घातली. मी मागील वेळी केलेली चूक यावेळी सातारच्या जनतेने दुरूस्त करावी, अशी विनंती केली. पवारांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा समस्त सातारकरांना श्री. पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची आठवण झाली. यानिमित्त श्री. पवार प्रेमींनी सातारा शहरात फ्लेक्‍सच्या माध्यमातून या आठवणींना उजाळा दिला आहे. 

VIDEO : मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची दिग्गज मंडळी भाजपच्या वाटेवर गेली. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले. चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभा निवडणूक लढून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांनीही विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही भाजपचेच सरकार पुन्हा येईल, सत्तेतील पक्षासोबत राहिल्यास मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच मंत्रीपदही मिळेल या आशेने सातारा जिल्ह्यातून खासदार उदयनराजे भोसले व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोण वाचविणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या 80 वर्षाच्या योद्याने संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढला. अजून मी म्हातारा झालेलो नाही, असे म्हणत पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली. 

जो बत्ती करतो गुल, तो नेता पावरफुल्ल!

एकीकडे भाजपकडून नरेंद्र मोदींपासून अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून केवळ एकच शरद पवार अशात प्रचाराचा धुरळा उडाला. यामध्ये सर्वाला कलाटणी देणारी ठरली ती साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धो पावसातील सांगता सभा. जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या या सभेकडे समस्त सातारकरांचे लक्ष लागले होते. या सभेपूर्वी साताऱ्यात मोदी, शहा यांच्या सभा झालेल्या होत्या. साताऱ्यातील सांगता सभेत धो पाऊस पडत असतानाही शरद पवार काय इशारा करणार हे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी भर पावसात सातारकर जिल्हा परिषदेच्या मैदानावर थांबून होते. श्री. पवार यांनी मागील वेळी माझ्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक या निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त करावी, असे आवाहन केले. या आवाहनाला कोण आला रे कोण आला... राष्ट्रवादीचा वाघ आला... अशा घोषणा देत समस्त सातारकरांनी दाद दिली. श्री. पवारांनी केलेली चूक विधानसभेसोबत झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारकरांनी दुरूस्त केली. भाजपकडून निवडणुक लढणारे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीतून साताऱ्याचे खासदार झाले. या सभेची नुकतीच वर्षपूर्तीही झाली. पण, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा या सभेच्या आठवणी प्रत्येक सातारकरांच्या मनात जाग्या झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर आपल्या घरात शरद पवारांचा धो पावसातील भाषण करतानाचा फोटो फ्रेम करून लावला आहे. श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका चाहत्याने साताऱ्यात पावसातील सभेचा त्यांचा फ्लेक्‍स लावून आठवणींना उजाळा दिली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top