भाजप-राष्ट्रवादीच्या आघाडीची शिवसेनेशी टक्कर; तारळ्यात कडव्या झुंजीचे संकेत
तारळेत देसाई गटाने 13 विरुध्द चार असे निर्भेळ यश मिळविले होते. त्यावेळी देसाई गट एकसंघ होता. चार वर्षांपूर्वी गटाचे (कै.) ऍड. बाळासाहेब जाधव व रामभाऊ लाहोटी यांनी भाजपत प्रवेश केल्याने देसाई गटाला धक्का बसला होता.
तारळे (जि. सातारा) : ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. राष्ट्रवादी व भाजपची नवलाईदेवी ग्रामविकास आघाडी व शिवसेनेचे नवलाईदेवी ग्रामविकास पॅनेल असा दुरंगी सामना आहे. एक अपक्षही नशीब अजमावत आहे. दोन्ही पॅनेलकडून विजयाचे दावे केले जात असले तरी सध्यातरी अंदाज वर्तवणे कठीण आहे.
तारळेत देसाई गटाने 13 विरुध्द चार असे निर्भेळ यश मिळविले होते. त्यावेळी देसाई गट एकसंघ होता. चार वर्षांपूर्वी गटाचे (कै.) ऍड. बाळासाहेब जाधव व रामभाऊ लाहोटी यांनी भाजपत प्रवेश केल्याने देसाई गटाला धक्का बसला होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाने येथील तिन्ही जागा गमावल्या होत्या. त्याचेच प्रत्यंतर सोसायटीत झाले. तेथे राष्ट्रवादी-भाजपची युती झाली. त्याचा निकाल 13 विरुद्ध शून्य असा निकाल लागल्याने देसाई गटाचा धुव्वा झाला. त्याच पार्श्वभूमीवर तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. भाजपबरोबरच्या युतीसाठी राष्ट्रवादी व शिवसेना इच्छुक होती. भाजपने राष्ट्रवादीशीच युती केल्याने युतीचेच पारडे जड झाले आहे. त्यामुळे निवडणुकीत दोन्ही गटांचा कस लागणार आहे.
Gram Panchayat Election : पुस्तकांच्या गावात राष्ट्रवादीसमोर भाजप-सेनेचे तगडे आव्हान
पंचायत समितीच्या निवडणुकीत तारळे गावात भाजपने सुमारे 1100 मते मिळविली. विधानसभेला मंत्री देसाईंच्या मताधिक्यात तारळेचा वाटा अल्प असल्याचे आकडेवारीवरून दिसले. देसाई गटासमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे. भाजपला मिळालेली मते अपघाताने मिळाली नव्हती, तेच या निवडणुकीत सिद्ध करावे लागेल. राष्ट्रवादीलादेखील जनाधार वाढवावा लागेल. तारळ्यातील निवडणूक एकतर्फी नाही. प्रत्यक्षात कडव्या झुंजीचे संकेत आहेत. प्रत्येक वॉर्डात चुरस वाढली आहे. त्यासाठी व्यक्तिगत गाठीभेटींवर उमेदवारांनी भर दिला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे