esakal | गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी 'ब्रेक'; गावागावांत शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

यावर्षी गुढी पाडव्याच्या सणावर कोरोना संसर्गाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव  वाढत आहे.

गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी 'ब्रेक'; गावागावांत शुकशुकाट

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : गुढी पाडव्याला नवीन मराठी वर्षाचा प्रारंभ होतो. यादिवशी सर्व ग्रामस्थ ग्रामदैवताच्या मंदिराजवळ एकत्र जमून गावच्या यात्रा-जत्रा, तसेच अन्य कामांबाबत चर्चा विनीमय करतात. चर्चेनंतर सर्वांना कडू लिंबाची पाने खायला दिली जातात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारी ही परंपरा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी या परंपरेला ब्रेक लागला आहे. 

गुढी पाडव्याला नवीन मराठी वर्षाचा प्रारंभ होतो. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी वेगवेगळी उद्घाटन, भूमिपूजने आदी सार्वजनिक तसेच खासगी कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. याशिवाय घरोघरी गुढ्या उभारण्याबरोबरच खरेदी-विक्रीचे व्यवहारही होत असतात. यावर्षी गुढी पाडव्याच्या सणावर कोरोना संसर्गाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव  वाढत आहे. तो रोखण्यासाठी शासन, प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून राज्यात लॉकडाउनची परिस्थिती आहे. त्यामुळे गावागावांतील बाजारसेठांसह गल्ली बोळांतही शुकशुकाट दिसत आहे. 

गुढीपाडव्याचा मुहूर्तावरील उलाढाल यंदाही ठप्पच; पंढरपूरातील साखरेच्या गाठ्यांना साता-यात मागणी 

गुढी पाढव्यादिवशी ग्रामीण भागांत सर्व ग्रामस्थ ग्रामदैवताच्या मंदिरात एकत्र येतात. त्याठिकाणी पंचांग वाचन केले जाते. त्यानंतर गावातील यात्रा-जत्रांच्या कार्यक्रमांबाबत तसेच गेल्या वर्षीचा जमा खर्च याशिवाय गावातील सार्वजनिक विषयांवर ग्रामस्थ चर्चा करतात. त्यानंतर कडू लिंब खाण्याचा कार्यक्रम होतो. त्यासाठी सर्वजण आपापल्या घर, शेताच्या परिसरात असणाऱ्या कडू लिंबाच्या झाडाची पाने आणतात. ही कडू लिंबाची पाने ठेचून त्यामध्ये हिंग, गुळ, जिरे, खोबरे घालून त्याचे मिश्रण बनविले जाते. नंतर हे कडूलिंबाचे मिश्रण सर्वजण आपापसांतील रागलोभ विसरून एकमेकांना लिंब खायला देतात. ग्रामीण भागांत याला लिंब खाणे असे म्हणतात. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. शासनाच्या जमावबंदी आदेशाचे पालन करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारी ही परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे.

याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय 

कडुलिंब चवीला कडू असला, तरी आरोग्यासाठी गोड! 

कडू लिंबाची पाने खाण्याला शास्त्रीय व आयुर्वेदिक महत्व आहे. कडू लिंबामध्ये विषाणू, जिवाणूंच्या विरोधात शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्याची ताकद आहे. याशिवाय कडूलिंब हा वय आहे ते दाखवू न देणारा (ॲन्टीएजिन), शरीरात वाढणाऱ्या परोपजीवी घटकांच्या विरोधात काम करणारा (ॲन्टीपॅरासेटिक) आहे. याशिवाय कडूलिंबामध्ये विविध औषधी व आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे  गुणधर्म आहेत. कडूलिंब चवीला कडू असला तरी त्याचे गुणधर्म आरोग्यासाठी गोड आहेत, त्यामुळे भारतात कडूलिंबाला शुभ वनस्पती मानतात. गुढी पाडव्याला कडू लिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. कडू लिंबाची पाने खाण्यास शास्त्रीय व आयुर्वेदिकदृष्ट्या मोठे महत्व  आहे.

-प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, वनस्पतीशास्त्र विभाग, शहाजीराजे महाविद्यालय, खटाव

संपादन : बाळकृष्ण मधाळे