शहरी नको... गावाकडच्या शाळाच बऱ्या

संजय जगताप
मंगळवार, 30 जून 2020

काेरोनाचा संसर्ग होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला. अद्यापही लस उपलब्ध न झाल्याने प्रत्येकाच्या मनात कोरोनाची धास्ती आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह बाहेरगावांहून आलेले चाकरमानी आता आपल्या मुलांनी स्थानिक शाळेतच प्रवेश घेत असल्याचे दिसते.

मायणी (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी व निमशहरी भागांतील शाळा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे असुरक्षितता व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील पालक स्थानिक शाळा-विद्यालयांतच मुलांना प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रसार पुणे-मुंबईसह ग्रामीण भागातील निमशहरी गावांमध्येही होऊ लागला आहे. कोरोना कधी आटोक्‍यात येणार, शाळा नेमक्‍या कधी सुरू होणार, मुलांचे शिक्षण कसे होणार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत कधी होणार, मुले तालुक्‍याच्या वा निमशहरी गावांतील शाळेत कशी पोचणार, त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार, अशा अनेक प्रश्नांचे काहुर सध्या पालकांच्या मनात ऊठले आहे. त्यामुळे पालक अस्वस्थ आहेत. ती अस्वस्थता, असुरक्षितता व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनीच त्यावर मार्ग शोधून काढला आहे. गावातीलच प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्ये मुलांना प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

तालुक्‍याच्या ठिकाणी वा निमशहरी गावांतील नामांकित शाळेत प्रवेश न घेता खेड्यातील पालक हे स्थानिक किंवा लगतच्या गावातील शाळेतच पाल्याचा प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. तेथे भरमसाट फी, डोनेशन द्यावे लागणार नाही. शिवाय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती यांसह विविध सरकारी योजनांचा लाभही मिळणार आहे. मुलांच्या प्रवास भाड्यापोटी होणारा खर्च वाचणार आहे. ये-जा करण्याची गैरसोय टळणार आहे. स्थानिक शाळेत सुरक्षिततेचा प्रश्न येणार नाही. मुलांच्या अभ्यासासह अन्य बाबींवरही लक्ष देणे शक्‍य होणार आहे. त्याशिवाय स्थानिक शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापकही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीची हमी देत आहेत. त्यामुळे पालक अधिक आकर्षित होत आहेत. 

दरम्यान, लॉकडाउनमुळे गावी आलेले शहरी भागातील पालकही आता परत जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. गावाकडेच शेतीवाडी वा अन्य उद्योग-व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे त्यांची शहरी भागातील नामांकित शाळांत शिकणारी मुलेही आता गावातील शाळा, विद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ लागली आहेत. 

आम्ही गावातल्याच चंद्रसेन विद्यालयात शिकलो. आमचं कुठं काय बिघडलं? आता इंग्लिश मीडियम, सेमी, सीबीएसई, महागडे क्‍लास यांचे फॅड निघालंय. पालकांनी मुलांच्या क्षमतेचा विचार करायला हवा. 

- कृष्णात घाडगे, पालक, धोंडेवाडी 

खेड्यापाड्यांतील पालक विद्यार्थ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी न पाठवता स्थानिक शाळेतच प्रवेश घेत आहेत. 

- शशिकांत खैरमोडे, मुख्याध्यापक, भुतेश्वर विद्यामंदिर, अंबवडे 

 

चीनच्या राष्ट्रपतींना 19 वेळा भेटून मोदींनी काय साधले ?,पृथ्वीराज चव्हाणांचा टाेला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara No Arban... Rural Schoo Has Better