येरळवाडी मध्यम प्रकल्प कार्यालयात अधिकारी, कर्मचारी टंचाई!

आयाज मुल्ला 
रविवार, 2 ऑगस्ट 2020


प्रत्यक्ष सिंचन कार्यक्षेत्रावर सिंचन व्यवस्थापक म्हणून काम करणारा शाखा अभियंता एकही नसल्याने या कामासाठी प्रत्यक्ष सहायक अभियंता श्रेणी एकच्या अधिकाऱ्यांनाच हे काम पाहावे लागत आहे. 

वडूज (जि. सातारा): येरळवाडी मध्यम प्रकल्प कार्यालयात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामांचा ताण सहन करावा लागत आहे. 

येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत दोन शाखा असून, यामध्ये वडूज व अंबवडे शाखेत प्रत्येकी 22 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तीन शाखा अभियंतापदे मंजूर असूून ही तीनही पदे रिक्त आहेत. तर दप्तर कारकून तीन पदे मंजूर असताना सध्या अंबवडे, वडूजसाठी एकच दप्तर कारकून कार्यरत असून, अन्य दोन पदे रिक्त आहेत. याच विभागात मोजणीदारांची आठ पदे मंजूर असून ही सर्व पदे रिक्तच आहेत. अंबवडे, वडूज शाखांसाठी कालवा निरीक्षकांची 16 पदे मंजूर असून, त्यापैकी 14 पदे रिक्त असल्याने हा पदभार केवळ दोन जणांना सांभाळावा लागत आहे. कालवा चौकीदारसाठी सहा पदे मंजूर आहेत. मात्र, यातील दोन पदे रिक्त असल्याने या पदांचा कारभार केवळ चार जणांनाच पाहावा लागत आहे. या विभागात असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची दोन पदे मंजूर असून, ही दोन्ही रिक्तच आहेत. 

प्रत्यक्ष सिंचन कार्यक्षेत्रावर सिंचन व्यवस्थापक म्हणून काम करणारा शाखा अभियंता एकही नसल्याने या कामासाठी प्रत्यक्ष सहायक अभियंता श्रेणी एकच्या अधिकाऱ्यांनाच हे काम पाहावे लागत आहे. शाखा अभियंत्यांना साह्य करण्यासाठी असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे पद ही रिक्त असल्याने यासाठी काम करणारा कर्मचारी नसल्याने अनेक कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कालवा असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष देखरेख करणे, दुरुस्ती करण्यासाठी असलेल्या कालवा निरीक्षकपदासाठी काम करणारी यंत्रणा फक्त दोन कर्मचारीच सांभाळत आहेत. कालवा निरीक्षकपदाच्या 14 जागा रिक्त असल्यामुळे या कामाचा ताणही दोनच कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. 

क्षेत्र मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र मोजणीदार हे पद आहे. मात्र, आठ पदे मंजूर असूनही यासाठी काम करणारा एकही मोजणीदार या विभागात कार्यरत नाही. त्यामुळे याठिकाणी असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा फटका कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सामान्य नागरिकांची असलेली काही कामे यामुळे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे. नजीकच असलेल्या उरमोडी सिंचन विभागातही काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता या विभागातील रिक्त जागा भरण्याची मागणी जनतेतून होत आहे. 

""अनेक रिक्त पदे असल्याने प्रलंबित कामाचा निपटारा होत नाही. पाणीपट्टी, सिंचन, बिगर सिंचन आकारणी व वसुलीस विलंब होत आहे. त्यामुळे या कामाचा ताण याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत होईल.'' 

-वि. म. बनसोडे, 
सहायक अभियंता श्रेणी एक 

संपादन : पांडुरंग बर्गे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Officers Staff Shortage In Yeralwadi Medium Project Office